'विधानसभा निवडणुका EVM वरच होणार', विरोधक आता काय करणार?

EVM Election: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका या ईव्हीएमद्वारेच होतील असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी आज स्पष्ट केलं आहे.

VVPAT_Representative_image
'विधानसभा निवडणुका EVM वरच होणार', विरोधक आता काय करणार?  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुका ईव्हीएमवर होणार असल्याचं मुख्य आयुक्तांनी केलं स्पष्ट
  • केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषद
  • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई: 'EVM हे अत्यंत सुरक्षित असून त्यामध्ये कुणीही छेडछाड करु शकत नाही. त्यामुळे बॅलेट पेपर ही अत्यंत जुनी यंत्रणा आहे. त्यामुळे आगामी निवडणुका या ईव्हीएमद्वारेच घेतल्या जातील.' असे स्पष्टपणे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह तीन सदस्यीय समिती सध्या राज्यातील निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतच्या पूर्वतयारीचीही माहिती दिली. 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. राज्यातील अनेक नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवरच घेण्यात यावी अशी मागणी केली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावा यासाठी पत्र देखील दिलं होतं. त्यानंतर मुंबईत सर्वपक्षीयांनी ईव्हीएमला विरोधही केला होता. 

विरोधकांच्या या भूमिकेनंतरही निवडणूक आयुक्तांनी दावा केला आहे की, ईव्हीएम हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणीही छेडछाड करु शकत नाही. त्यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका या ईव्हीएमद्वारे होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात एकूण ६१ टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिक प्रयत्न करावेत असंही यावेळी आयुक्तांनी सांगितलं. तसंच १८ ते ३५ वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात यावं असंही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितलं. 

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांनी कालपासून राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, विविध राजकीय पक्षाचे नेते, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून निवडणुकीच्या एकूण तयारीचा आढावा घेतला. तसंच या सर्वांना उपयुक्त अशा सूचना देखील केल्या. यावेळी मतदारांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याच्या सूचना देखील मुख्य आयुक्तांनी केल्या आहेत. 

याचवेळी राज्यात विविध पक्षांच्या सुमारे १ लाख २८ हजार २१६ बूथ लेव्हल एजंटची नेमणूक करण्यात आली असल्याचीही माहिती मुख्य आयुक्तांनी दिली. या बूथ एजंटच्या मदतीने मतदार यादी अचूक आणि अद्यावत करण्यासाठी मोठी मदत होईल. ज्याचा निवडणूक यंत्रणेला खूपच फायदा होऊ शकतो. असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी