Lok Sabha 2019 : मुंबईत मिलिंद देवरा अडचणीत; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 16:49 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : जैन मंदिराबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस शिजवल्याचा आरोप मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केला होता. या प्रकरणी तक्रारीनंतर देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

case against milind deora for violation of the Model Code of Conduct
मिलिंद देवरा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मिलिंद देवरांना वादग्रस्त वक्तव्य भोवले; अखेर गुन्हा दाखल
  • जैन समाज आणि शिवसेने विषयी देवरा यांचे वादग्रस्त वक्तव्य
  • निवडणूक आयोगाने घेतली शिवसेनेच्या तक्रारीची दखल

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. भाषणातून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप देवरा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेकडून देवरा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

काय? आणि कोठे बोलले देवरा?

भुलेश्वर मार्केट येथील व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मिलिंद देवरा यांची ४ एप्रिल रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात देवरा यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. जैन मंदिराबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस शिजवल्याचा आरोप देवरा यांनी त्या बैठकीत केला होता. त्यावरून शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्याची आयोगाने दखल घेतली आणि एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यात देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने अॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी तक्रार दाखल केली होती. त्यात पुरावा म्हणून देवरा यांच्या भाषणाची सीडी ही जोडण्यात आली आहे. शिवसेनेने मांस शिवजण्याचा असा कोणताही प्रकार केलेला नाही. त्यामुळे खोटे वक्तव्य करून जैन समाज आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न देवरा यांनी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

दक्षिण मुंबईची लढत चुरशीची

मुंबईत दक्षिण मुंबईतील मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत ही लढत खूप रंगतदार मानली जात आहे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईला २००९मध्ये मिलिंद देवरा यांनी आपल्याकडे खेचलं होतं. पण, २०१४ मध्ये मोदी लाटेत देवरा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार झाले. पण, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलंय. देवरा यांनी या भागात सुरुवातीपासून चांगली गट बांधणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही लढत तेवढी सोपी नाही. त्यामुळे मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांना जोर चढला आहे. मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी २००९मध्ये पाचवेळा खासदार झालेल्या शिवसेनेच्या मोहन रावळ यांचा पराभव केला होता. सध्या मुंबई काँग्रेसची जबाबदारीदेखील देवरा यांच्यावर आहेत. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद संजय निरुपम यांच्याकडून काढून घेऊन देवरा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : मुंबईत मिलिंद देवरा अडचणीत; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल Description: Lok Sabha 2019 : जैन मंदिराबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस शिजवल्याचा आरोप मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केला होता. या प्रकरणी तक्रारीनंतर देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Loading...
Loading...
Loading...