‘त्यांच्या’ पाठिंब्यामुळेच तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 11:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निवडणूक २०१९च्या तिसऱ्या टप्प्याचं उद्या मतदान होणार आहे. त्यापूर्वी रविवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व नेत्यांच्या तोफा धडाडल्या. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय

Devendra Fadanvis
मुख्यमंत्री पवारांवर बरसले  |  फोटो सौजन्य: Facebook

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला लगावला. शरद पवारांनी अकलूज येथे झालेल्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी ‘चड्डी’वरून टीका केली होती. त्याला उत्तर देतांना, ‘ज्या चड्डीवरुन तुम्ही बोलत आहात, त्याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात, हे विसरु नका’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या २३ एप्रिलला होणार आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज इथल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. “भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?” असा टोला विजयसिंह मोहिते पाटील यांना लगावला होता.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातल्या कुर्डुवाडीत रविवारी झालेल्या सभेत शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पवारांवर टीकास्त्र सोडतांना ‘आता आमची फुल पँट झाली आहे असं म्हणत, आपण ज्या खालच्या पातळीवर जाऊ शकता, तिथं मला जाता येत नाही’, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. येत्या २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल आहे आणि निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच कळेल की, कोणाची चड्डी उतरते, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

२३ एप्रिलला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात राज्यातील १४ जागांवर मतदान होणार आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, गिरीश बापट, डॉ. सुजय विखे, चंद्रकांत खैरे, निलेश राणे आणि राजू शेट्टी या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये उद्या कैद होणार आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘त्यांच्या’ पाठिंब्यामुळेच तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला Description: लोकसभा निवडणूक २०१९च्या तिसऱ्या टप्प्याचं उद्या मतदान होणार आहे. त्यापूर्वी रविवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व नेत्यांच्या तोफा धडाडल्या. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय
Loading...
Loading...
Loading...