“राणेंसोबत जाणाऱ्यांचा कपाळमोक्ष होतो”, माजी आमदार कांबळेंची खंत

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून नारायण राणेंनी आपल्यासोबत २१ आमदार फोडले होते. राणेंसोबत गेल्याचा पश्चाताप होत असल्याची खंत माजी आमदार शंकर कांबळी यांनी बोलून दाखवली.

Narayan Rane
नारायण राणे  |  फोटो सौजन्य: BCCL

सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मदतानाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा आणि भाषणं सुरू आहेत. मात्र या सर्वांमध्ये एका माजी आमदारानं आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलं आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात युतीच्या सभेमध्ये माजी आमदार शंकर कांबळी यांनी आपल्या मनातील सल जनतेसमोर आणली. आपण शिवसेना सोडून मूर्खपणा केल्याचं कांबळी म्हणाले. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली. तेव्हा त्यांनी शिवसेनेचे २१ आमदार फोडले. त्यात मी ही एक होतो, असं कांबळींनी सांगितलं. मात्र तो माझा मूर्खपणा होता, असं कांबळी यांनी सांगितलं.

नारायण राणेंनी माझं राजकीय अस्तित्त्व संपवलं, असा आरोप माजी आमदार शंकर कांबळी यांनी केला. राणेंनी स्वत:चा स्वाभिमानी पक्ष स्थापन केला आणि मुलांसोबत तिथं गेले. राणेंना मुलं जिथं नेतात, तिथं ते जातात, असंही कांबळी म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना सर्वोच्च पद दिलं. त्यांना मुख्यमंत्री केलं. मात्र राणेंनी गद्दारी करत शिवसेना सोडली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपणच माय-बाप असा विचार राणे करतात. त्यांनी शिवसेना फोडून २१ आमदारांना आपल्या सोबत घेतलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र नारायण राणे आपल्या मित्रांना विसरले, असं म्हणत कांबळी यांनी राणेंवर टिकास्त्र सोडलं. याबाबतचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 

काँग्रेस सोडून राणेंनी स्वाभिमानी पक्षाच्या स्थापना केली. राणे आता स्वाभिमानी पक्षाद्वारे काँग्रेसवर सोनिया आणि राहुल गांधींवर पण टीका करतात. कुणाच्या मानगुटीवर कसा पाय द्यायचा हे राणे बरोबर जाणतात, असं कांबळी म्हणाले. राणेंचा जुना मित्र परिवार त्यांच्या या स्वभावामुळेच आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांमुळे दूर गेल्याचंही कांबळी यांनी सांगितलं.

ज्या शिवसेनेनं मला तीन वेळा आमदार केलं, त्याच शिवसेनेला मी राणेंसाठी सोडलं याचा पश्चाताप होत असल्याचं कांबळी म्हणाले. सोबतच राणेंसोबत जो कुणी जातो त्याचा कपाळमोक्ष होतो, असं म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.

नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे बाळासाहेब ठाकरेंवर टीका करतात, त्यांना शिव्या देतात, मात्र बाळासाहेबांबद्दल काही बोलण्याची आणि त्यांच्या चपलांजवळही उभी राहण्याची निलेश राणेंची लायकी नाही, अशी जहरी टिका शंकर कांबळी यांनी राणेंवर केली.

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...