गेटवे ऑफ लोकसभा (भाग- १): लक्षद्वीप मतदारसंघाबाबतची रंजक माहिती

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 18:33 IST | ओंकार देशमुख, बीड

सध्या देशात निवडणुकांचं वातावरण आहे. अशावेळी सगळीकडेच या चर्चा आहे ती राजकारणाची. त्यामुळे आता टाइम्स नाऊ देखील खास आपल्यासाठी लोकसभा निवडणुकीसंदर्भात 'गेटवे ऑफ लोकसभा' या सदरातून रंजक माहिती घेऊन आलं आहे.

parliament_bccl
गेट वे ऑफ लोकसभा (भाग- १): लक्षद्वीप मतदारसंघाबातची रंजक माहिती  |  फोटो सौजन्य: BCCL

मतदारसंघ : लक्षद्वीप

लक्षद्वीप हा भारताच्या अति दक्षिणेकडील शेवटचा व सर्वात लहान लोकसभा मतदार संघ. हा किती लहान आहे याचा अंदाज येण्यासाठी एक उदाहरण देतो. १९५७ ते १९६७ या कालावधीत या बेटांसाठी निवडणूकच घेण्यात येत नव्हती, राष्ट्रपती थेट खासदाराची नेमणूक करीत. के. नल्ला कोया थंगल हे लक्षद्वीपचे पहिले व शेवटचे राष्ट्रपती नियुक्त खासदार. जवळपास ३९ बेटांचा समूह असलेल्या या मतदारसंघाचे एकूण क्षेत्रफळ आहे अवघे ३२.६९ वर्ग किमी. या ३९ पैकी केवळ १० बेटांवर लोकवस्ती आहे, एकच जिल्हा आहे व जिल्ह्याचे ठिकाण आहे कवरत्ती. हीच राजधानी. सर्वात मोठे बेट अँड्रॉथ (अपुऱ्या जैविक संसाधनांमुळे या बेटावर पर्यटकांना प्रवेश नाही). या मतदारसंघाची एकूण लोकसंख्या आहे जवळपास ७८ हजार (२०११ च्या जनगणनेनुसार ६४,४२९) त्यापैकी मतदार आहेत ४९,९२२. या बेटांवर सर्वात मोठा धर्म आहे इस्लाम. तब्बल ९६% लोक इस्लामचे अनुयायी आहेत. इतर धर्मियांचे अस्तित्व नगण्य आहे. ८३% लोक मल्याळम वंशाचे तर १७ टक्के लोक माल्ह वंशाचे आहेत. 

१९६७ पासून ते २००४ पर्यंत या बेटांचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले ते पदनाथ मोहम्मद उर्फ पी. एम. सईद यांनी. १९६७ साली ते लोकसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले व १९७१ च्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. त्यावेळी ते बिनविरोध निवडून गेले होते. तेव्हा पासून २००४ ला जनता दल (संयुक्त) च्या पुकून्ही कोया यांच्याकडून ७१ मतांनी पराभूत होईपर्यंत विक्रमी सलग १० वेळा तेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. २००९ मात्र त्यांचे पुत्र मोहम्मद हमदुल्लाह सईद यांनी ही जागा जिंकली, पण २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहम्मद पी. पी. फैजल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 

यावेळी राष्ट्रवादीने पुन्हा एकदा विद्यमान खासदार फैजल यांनाच संधी दिली आहे. महाराष्ट्रात मित्रपक्ष असणारी राष्ट्रवादी केरळ व लक्षद्वीपमध्ये काँग्रेसची कट्टर विरोधक आहे. त्यामुळे काँग्रेसने तिथे आपला उमेदवार म्हणून माजी खासदार मोहम्मद हमदुल्लाह यांना परत संधी दिली आहे. भाजपने इथे नेहमीपेक्षा खूप जास्त ताकद लावलेली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या मतदारसंघाचा दोन-तीन वेळा दौरा केला आहे. पंतप्रधान मोदी देखील इथे विकासकामांसाठी जाऊन आले आहेत. भाजपने या ठिकाणी अब्दुल खदिर हाजी यांना तिकीट दिले आहे. तर दोन्ही डाव्या पक्षांनी आपापले उमेदवार इथे उभे केले आहेत. तर जदयूने देखील इथे उमेदवार निवडणूक रिंगणात  उतरवला आहे. या सहा उमेदवारांचे भवितव्य जवळपास ५० हजार मतदार ठरविणार आहेत. ९१% हुन अधिक सुशिक्षित असलेले येथील मतदार आपल्या विवेकावर निर्णय घेतलीच. पहिल्या टप्प्यातच त्यांचे भवितव्य पेटीत बंद होणार असले तरी प्रतीक्षा असेल ती २३ मे चीच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी