गेटवे ऑफ लोकसभा (भाग- २): राजकीय वातावरणात तापलेलं 'लडाख'

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 18, 2019 | 09:28 IST | ओंकार देशमुख, बीड

सध्या देशात निवडणुकांचं वातावरण आहे. नाक्यावर, कट्ट्यावर चर्चा आहे ती राजकारणाची. म्हणूनच टाइम्स नाऊ मराठी देखील आपल्यासाठी लोकसभा निवडणुकीसंदर्भात 'गेट वे ऑफ लोकसभा' या सदरातून रंजक माहिती घेऊन आलं आहे.

ladakh_ians
लडाख  |  फोटो सौजन्य: IANS

मतदार संघ : लडाख

आपण पहिल्या भागात लक्षद्वीप ह्या भारतातील मतदारसंख्येने सर्वात लहान मतदारसंघाबद्दल पाहिलं. तो भारताच्या अति दक्षिणेकडील मतदारसंघ होता. आता आपण पाहणार आहोत अति उत्तरेकडील लडाख. जम्मू काश्मीर राज्यातील ६ पैकी एक लोकसभा मतदार संघ एवढीच याची ओळख नाही. तर ह्याची स्वतःची अनेक वैशिष्ट्ये आहेत. लडाख समुद्र सपाटीपासून तब्बल ११ हजार फूट उंचीवर आहे. इंग्रजीत याला 'Land of High Passes' असेही म्हणतात. हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. याचे क्षेत्रफळ १ लाख ७३ हजार चौरस किमी एवढे अवाढव्य आहे. बरं एवढ्या भव्य मतदारसंघात मतदार किती असतील? केवळ १ लाख ६३ हजार! भारतात अल्पसंख्याक बहुल मतदारसंघ खूप आहेत, पण त्यात मुस्लिम किंवा ख्रिश्चन समाजाचे प्रमाण जास्त असते. इथे मुस्लिम व बुद्ध असे दोन समाज प्राबल्याने आहेत. लडाख लोकसभा मतदारसंघात ४ विधानसभा क्षेत्र येतात. लेह, कारगिल, नोब्रा व झंस्कार. कारगिल जिल्हा हा मुस्लिमबहुल आहे, जिथे ७६% शिया मुस्लिम लोक राहतात. तर लेह जिल्हा बुद्ध बहुल आहेत, तिथे ६७% बौद्ध समाज आहे. इथे हिंदू अल्पसंख्याक आहेत, संपूर्ण मतदारसंघात १२ ते १५% हिंदू समाज आढळतो. 

१९५२ साली देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. काश्मीरचे एकूण वातावरणच अस्थिर असल्याने असेल कदाचित, पण तेथील सहाही खासदार हे राष्ट्रपती नियुक्त होते. १९६७ पर्यंत लडाखला लोकसभेत प्रतिनिधित्व असे नव्हतेच. १९६७ साली प्रथमच लडाख लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला व काँग्रेसचे के. जी. बकुल इथून पहिले खासदार झाले. १९७१ साली त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली, तर १९७७ साली काँग्रेसच्याच पार्वतीदेवी ह्या लडाखच्या पहिल्या महिला खासदार झाल्या. १९८० साली काँग्रेसचेच पी. नामग्याल यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तर १९८४ च्या वादळी बहुमतात त्यांनी दुसरी टर्म गाठली. १९८९ साली इथे मोहम्मद हसन कमांडर यांनी प्रथमच अपक्ष निवडून येत इतिहास घडवला. १९९१ साली काश्मिरात आणीबाणी सदृश्य परिस्थिती उत्पन्न झाल्याने लडाखमध्ये निवडणूक होऊ शकली नाही. १९९६ साली माजी खासदार पी. नामग्याल पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेचे धनी ठरले. 

१९९८ साली पहिल्यांदाच फारुख अब्दुल्ला यांच्या जम्मू एंड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला इथे यश मिळालं. त्यांचे सय्यद हुसेन हे खासदार झाले. १९९९ साली एनसी ने हसन खान हा नवा चेहरा खासदार म्हणून दिला. २००४ साली थुपस्थान छेवांग यांनी अपक्ष म्हणून लोकसभेत प्रवेश केला. तर २००९ साली हसन खान अपक्ष खासदार निवडले गेले. २०१४ साली लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊ वगैरे आश्वासने भाजपने दिल्याने छेवांग यांनी भाजपला जवळ केले. मोदी लाटेत इतिहास देखील घडला, भाजपने ही जागा प्रथमच जिंकली. केवळ ३६ मतांच्या फरकाने छेवांग यांनी अपक्ष उमेदवार गुलाम रजा यांचा पराभव केला. मात्र पुढे भाजपने आपले आश्वासन पाळले नाही, असा आरोप करीत छेवांग यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये पदाचा राजीनामा दिला.
 
७१ वर्षीय छेवांग हे राजघराण्याशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत. त्यांची पत्नी सरला छेवांग ह्या महाराजा छोसग्याल कुंगझ्यांग नामग्याल यांची कन्या आहेत, तर विद्यमान राजे जिग्मेट नामग्याल यांच्या भगिनी आहेत. थुपस्थान छेवांग पराकोटीचे धार्मिक असून आपण आता सक्रिय राजकारणातून संन्यास घेऊन बुद्ध धर्मासाठी आयुष्य व्यतीत करणार असल्याचे सांगत आहेत. 

छेवांगसारख्या मातब्बर व्यक्तीच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. भाजपने अनेक प्रयत्न करूनही छेवांग यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने भाजपने यंदा जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना मैदानात उतरविले आहे. दुसरीकडे काँग्रेसने इथे उमेदवार घोषित केलेला नाही. इथे ६ मे रोजी मतदान असल्याने तूर्तास सबुरीने घ्यायचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. मागील वेळी अपक्ष उमेदवार असलेले गुलाम रझा यांना यंदा काँग्रेसच्या तिकिटाची आस आहे. मागीलवेळी त्यांच्या बंडखोरीमुळेच काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानी घसरला होता. निष्ठावंत काँग्रेसी प्रमाणे तिकिटाचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात असल्याचे रझा म्हणत आहेत. यावेळी आम्हाला भाजप पासून कसलाही धोका नसल्याचे सांगायलाही ते विसरत नाहीत. दुसरीकडे यूपीएचा घटक पक्ष असणाऱ्या एनसीने इथे मैत्रीपूर्ण लढत होईल असे सांगून इथे उमेदवार देण्याचा इरादा दाखवला आहे. 

भाजप अध्यक्ष अमित शहा मात्र एक एक सीट महत्वाची समजून लढत आहेत. ३१ वर्षीय नामग्याल यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करण्याचे निर्देश त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना व केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना दिले आहेत. एकूणच काय तर हिमालयातील थंडगार वाऱ्यातही लडाख मधील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले पाहायला मिळत आहे. ६ मे पर्यंत हे राजकीय वारे असेच वाहत राहतील हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गेटवे ऑफ लोकसभा (भाग- २): राजकीय वातावरणात तापलेलं 'लडाख' Description: सध्या देशात निवडणुकांचं वातावरण आहे. नाक्यावर, कट्ट्यावर चर्चा आहे ती राजकारणाची. म्हणूनच टाइम्स नाऊ मराठी देखील आपल्यासाठी लोकसभा निवडणुकीसंदर्भात 'गेट वे ऑफ लोकसभा' या सदरातून रंजक माहिती घेऊन आलं आहे.
Loading...
Loading...
Loading...