गेटवे ऑफ लोकसभा (भाग ५): क्षेत्रफळाने देशातील सर्वात लहान मतदारसंघ 'चांदणी चौक' 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 08:41 IST | ओंकार देशमुख, बीड

Gateway of lok sabha सध्या देशात निवडणुकांचं वातावरण आहे. सगळीकडे चर्चा आहे ती राजकारणाची. म्हणूनच Times Now मराठी देखील आपल्यासाठी लोकसभा निवडणुकीसंदर्भात 'गेट वे ऑफ लोकसभा' या सदरातून रंजक माहिती घेऊन आलं आहे

parliament_bccl
गेटवे ऑफ लोकसभा (भाग ५): मतदारसंघ चांदणी चौक  |  फोटो सौजन्य: BCCL

गेटवे ऑफ लोकसभा भाग ५ : मतदारसंघ चांदणी चौक 

देशाच्या राजधानीतील एक महत्वाचा भाग म्हणून चांदणी चौक हा ओळखला जातो. देशातील सर्वाधिक प्रसिद्ध चौक कुठले म्हणले तर लोक चांदणी चौक असे नाव घेतील एवढा हा प्रसिद्ध आहे. जुन्या म्हणजेच पुरानी दिल्लीतील सर्वात मोठे मार्केट प्लेस म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनपासून जवळच असणाऱ्या हा मतदारसंघ देशातील एक जुना पण वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ आहे.

ऐतिहासिक काळापासून हा भाग व्यापार उदीमाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आजही हा भाग छोट्या गल्ल्यांमध्ये अनेक फेरीवाल्यांच्या गर्दीने फुललेला पाहायला मिळतो. येथे हजारो प्रकारच्या दुकाना आहेत, ज्यात विविध प्रकारची खरेदी करण्याची मनसोक्त मौज लुटता येऊ शकते. खवय्यांसाठी तर हा खास स्टॉप आहे. कारण येथे किमान १००० हजाराहून अधिक व्यंजने चाखायला मिळतात. येथील जलेबी (देशी घी वाली), गाजर का हलवा, रबडी, पराठा गल्ली ह्या न चुकवता येणाऱ्या प्रलोभनात मोडतात. मांसाहारी लोकांसाठी पण येथे वेगवेगळ्या प्रकारचे चिकन, झारी आदी कुठेही उपलब्ध होतं. कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, दागिने, क्रॉकरी आदी वस्तू तर इथे फुटा-फुटावर मिळतात. 

ह्या चांदणी चौकचे वैशिष्ट्य म्हणजे क्षेत्रफळाने हा देशातील सर्वात लहान मतदारसंघ आहे. याचे क्षेत्रफळ अवघे १०.५९ वर्ग किमी आहे. एवढ्याशा मतदारसंघात तब्बल १४,४७,२३० मतदार आहेत. चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात आदर्शनगर, शालिमार बाग, शकूर बस्ती, त्रिनगर, वझीरपूर, मॉडेल टाऊन, सदर बाजार, चांदणी चौक, मातीआ महल व बल्लीमारन हे दहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील एकही मतदारसंघात भाजपचा आमदार नाही. सर्व आपचे आहेत.

१९५६ साली या मतदार संघाची निर्मिती झाल्यापासून तीनवेळा ह्याच्या सीमांमध्ये महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. येथे १९५७ साली झालेली पहिली सार्वत्रिक निवडणूक काँग्रेसच्या राधा रमण यांनी जिंकली होती. तर १९६२ साली काँग्रेसच्याच शाम नाथ यांना विजय मिळाला होता. त्यानंतर  सीमांची पुनर्निश्चिती झाली. १९६७ साली भारतीय जनसंघाच्या रामगोपाल शालवाले यांनी इथे प्रथमच काँग्रेसेतर झेंडा फडकविला. मात्र १९७१ साली काँग्रेसच्या सुभद्रा जोशी यांनी ही जागा पुन्हा काँग्रेसच्या पारड्यात आणतानाच येथील पहिली महिला खासदार होण्याचा मानही मिळवला. १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या सिकंदर बख्त यांनी येथून विजयश्री मिळवली. ते या मतदारसंघातील आतापर्यंतचे एकमेव मुस्लिम खासदार आहेत. १९८० साली काँग्रेसच्या भिकुराम जैन यांनी पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला. तर १९८४ साली जय प्रकाश अग्रवाल यांनी तो कायम ठेवला. १९९१ साली भाजपला येथे शिरकावाची संधी मिळाली. भाजपच्या ताराचंद खंडेलवाल यांनी येथून विजय प्राप्त केला. यानंतर पुन्हा मतदारसंघाची सीमा पुनर्निश्चिती करण्यात आली. १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल यांनी विजयाची पताका लावली. तर १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत विजय गोयल या तत्कालीन युवा चेहऱ्याने प्रथमच सलग दोन वेळा विजयी होण्याचा मान पटकावला. 

२००४ साली भाजपनं येथून स्मृती इराणी यांना कपिल सिब्बल यांच्या विरोधात उतरवलं होतं, पण त्या जेमतेम ४८ हजार मतेच घेऊ शकल्या, सिब्बल यांनी पाऊणे दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवला. २००९ साली सिब्बल यांनी भाजपच्या विजेंद्र गुप्ता यांचा २ लाख मतांनी पराभव केला. २००९ साली पुन्हा एकदा या मतदारसंघाच्या सीमांची पुनर्निश्चिती झाली. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या डॉ. हर्षवर्धन सिंह यांनी कपिल सिब्बल यांचा १,३६,३२० मतांनी पराभव केला.
 
या मतदारसंघात २० टक्क्यांहून अधिक असणारा मुस्लिम मतदार खासदार ठरविण्यात मोलाची भूमिका बजावत आला आहे. याहीवेळी त्यांच्या मतांवर काँग्रेस व आपची भिस्त राहणार आहे. पण दिल्लीमधील मतदान सहाव्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे इतर पक्षांची फारशी लगबग अदयाप दिसून येत नाही. भाजपने येथे चिरपरिचित चेहरा विजय गोयल यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत. आम आदमी पक्षानेही जोर लावताना येथून पंकज गुप्ता यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने अदयाप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. याठिकाणी काँग्रेस, आप व भाजपमध्येच मुख्य लढत होणार असली, तरी आप-काँग्रेस आघाडी न होणे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. आपने उमेदवार घोषित केल्याने गोयल यांचा जीव भांड्यात पडला असेल, कारण आता आघाडीची आशा जवळपास मावळली आहे. आता काँग्रेस-आप आघाडी न होण्याचा कितपत फायदा त्यांना मिळेल, याचे उत्तर तर येणार काळच देऊ शकेल. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गेटवे ऑफ लोकसभा (भाग ५): क्षेत्रफळाने देशातील सर्वात लहान मतदारसंघ 'चांदणी चौक'  Description: Gateway of lok sabha सध्या देशात निवडणुकांचं वातावरण आहे. सगळीकडे चर्चा आहे ती राजकारणाची. म्हणूनच Times Now मराठी देखील आपल्यासाठी लोकसभा निवडणुकीसंदर्भात 'गेट वे ऑफ लोकसभा' या सदरातून रंजक माहिती घेऊन आलं आहे
Loading...
Loading...
Loading...