kolhapur lok sabha results 2019: कोल्हापुरात पहिल्यांदाच शिवसेनेला कौल; सोयीच्या राजकारणाचा महाडिकांना फटका

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

kolhapur lok sabha results 2019: कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागत आहे. शिवसेनेच्या संजय मंडलिकांना भक्कम आघाडी मिळालीय.

Shivsena sanjay Mandlik
शिवजयंती मिरवणुकीत संजय मंडलिक (फेटा घातलेले) आणि सतेज पाटील एकत्र  |  फोटो सौजन्य: Facebook

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गट आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापूरची जागा गमवावी लागण्याची चिन्हे आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते खासदार धनंजय महाडिक यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागत आहे. दुपारी दीडपर्यंत आलेल्या मतमोजणी कलानुसार प्रत्येक फेरीमध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी भक्कम आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या मंडलिक यांना आघाडी दिसत आहे. पोस्टल मतांपासून मंडलिक यांना आघाडी घेतली होती. ती बाराव्या फेरीपर्यंत कायम राहिली. या संदर्भात दुपारी दीडपर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये मंडलिक जवळपास एक लाख ९८ हजार मतांनी आघाडीवर होते. मतमोजणीचा सकाळपासूनच कल पाहता एवढे लीड तुटण्याची कोणतिही शक्यता दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूकरांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कौल दिला आहे.

महाडिकांचे सोयीचे राजकारण

आमदार सतेज पाटील यांना २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांना त्यांचा पराभव केला होता. निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे तिकिट मिळवून त्यांनी ही किमया साधली होती. त्यावेळी राष्ट्रवादाची खासदार असलेल्या धनंजय महाडिक यांनी भावासाठी भाजपला मदत केल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला होता. त्यामुळेच त्यांनी ‘आम्हाला मदत न करणाऱ्यांना मदत करणार नाही’, असं सांगून ‘आमचं ठरलंय’ अशी टॅगलाईन दिली होती. ती इतकी लोकप्रिय झाली होती. त्याची महाराष्ट्रात चर्चा झाली. याच कॅम्पेनचा खूप मोठा फटका धनंजय महाडिक यांना बसला आहे. महापालिका निवडणुकीतही धनंजय महाडिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी त्यांचे काका महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीला मदत केली. परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज होते. महाडिक यांच्या निवडणूक प्रचाराच्यावेळी शरद पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यांनाही नगरसेवक उपस्थित नव्हते. त्यावर पक्षाने नगरसेवकांना कारणेदाखवा नोटीस बजावली होती. नगरसेवकांनी खुलासे केले पण, प्रचाराला उतरले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार महाडिक यांनी चुलत भाऊ अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिक महाडिक यांना भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद अध्यक्ष केले. भाजपच सदस्यांच्या बसचे सारथ्य स्वतः त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. धनंजय महाडिक यांनी लोकसभेला विजय झाल्यानंतर कायम स्थानिक राजकारणात सोयीची भूमिका घेतली. त्याची मोठी किंमत त्यांना या पराभवाच्या माध्यमातून मोजावी लागत आहे.

सतेज पाटील ठरले ‘किंगमेकर’

आमदार सतेज पाटील स्वतः निवडणूक रिंगणात न उतरता किंगमेकर ठरले. त्यांनी या निवडणुकीची तयारी वर्षा दीड वर्षापूर्वीच केली होती. मुरगूडमध्ये सदाशिवराव मंडलिक फाउंडेशनच्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा २०१४च्या निवडणुकीत आपली चूक झाली, अशी जाहीर कबुली देऊन लोकसभा निवडणुकीचे जणू चित्रच स्पष्ट केले होते. त्याचबरोबर त्यांनी मंडलिक यांना कोणतिही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा बँकेत मंडलिक व मुश्रीफ यांनी जुळवून घ्यावे यासाठी प्रयत्न केले. या सगळ्याचा परिणाम लोकसभेच्या मतपेटीत झालेला दिसला.

लाट नव्हे, स्थानिक गणितं

कोल्हापूर फारसं कोणत्या लाटेच्या मागं धावणारं नाही हा आजवरचा ट्रेंड आहे. १९९९च्या निवडणुकीत देशात भाजपचं वारं होतं. त्यावेळीही कोल्हापूरनं राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला होता. त्यानंतर २००४मध्येही राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक निवडून आले. पुढे २००९मध्ये युपीए पुन्हा जोमाने सत्ते आली. पण, त्यावेळी कोल्हापूरनं राष्ट्रवादीतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना निवडून दिले. तोच कित्ता २०१४मध्ये कोल्हापूरकरांनी गिरवला. संपूर्ण देशात मोदींची लाट असताना कोल्हापूकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांना निवडून दिले होते. त्यामुळे कोल्हापुरात पक्षा पेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला महत्त्व आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
kolhapur lok sabha results 2019: कोल्हापुरात पहिल्यांदाच शिवसेनेला कौल; सोयीच्या राजकारणाचा महाडिकांना फटका Description: kolhapur lok sabha results 2019: कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागत आहे. शिवसेनेच्या संजय मंडलिकांना भक्कम आघाडी मिळालीय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles