Lok Sabha 2019: मतदान केंद्रातच हृदयविकाराचा झटका, दोघांचा मृत्यू

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 29, 2019 | 11:56 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019: ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर, भिवंडी येथे दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचा मृत्यू झाला.

Heart attack file photo
निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Times Now

ठाणे: निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. एका आठवड्यात अशा दोन घटना घडल्या असून, दोन्ही घटना ठाणे जिल्ह्यातीलच आहेत. प्रचंड उष्मा असल्यामुळे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हृदयविकाराने दोघांचा मृत्यू झाला आहे. बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. उल्हासनगर महापालिकेचे शिपाई भगवान मगरे यांचा लोकसभा निवडणुकीच्या कामावर असताना रविवारी मृत्यू झाला. मतदान केंद्रावर साहित्य घेऊन गेल्यानंतर काम सुरू असताना मगरे अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मगरे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, शिपाई भगवान मगरे रविवारी सकाळी निवडणूक कार्यालयाकडे सहकाऱ्यांसोबत रवाना झाला होते. उल्हासनगर कॅम्प नं.-३, सी ब्लॉक येथील मीनल चव्हाण विद्यालयातील मतदान केंद्र ८७ मध्ये मगरे यांची नियुक्ती झाली होती. मतदान केंद्रातच दुपारी काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि मगरे बेशुद्ध पडले. त्यांना सहकाऱ्यांनी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनीही डॉक्टरांच्या हवाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मगरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. महापालिकेतील अधिकारी, आयुक्त तसेच पोलिसांनी मगरे यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. उल्हासनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीच्या कामासाठी असलेल्या दशरथ कोरडे (५७) या पोलिसांचा मृत्यू झाला. कोरडे हे निजामपूर पोलिस ठाण्यात काम करत होते. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असताना कोरडे यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना सहकाऱ्यांनी इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले होते. तेथील प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढे ठाणे-कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली आहे.

नागरिकांना आवाहन

आपल्या आजूबाजुला निवडणुकीच्या कामासाठी कोणी पोलीस किंवा इतर कर्मचारी तैनात असतील, तर त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना तात्पुरता निवारा द्या, त्यांच्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करा, त्यांना काय हव नको, याची चौकशी करा, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. काही ठिकाणी या आवाहनाला प्रतिसादही मिळताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी