Lok Sabha 2019 : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडे भरकटल्या; केलं वादग्रस्त वक्तव्य

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 21:26 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अंगावर बॉम्ब बांधून त्यांना दुसऱ्या देशात पाठवायला पाहिजे, असं वादग्रस्त विधान करून महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.

Minister Pankaja Munde
पंकजा मुंडेंचे राहुल गांधींविरुद्ध आक्षेपार्ह विधान  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय वादळ उठलं आहे. रविवारी एका जाहीर सभेत पंकजा मुंडे यांची जीभ घसरली आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून, या वक्तव्यावरून पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले जात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचे सरकारकडून आणि हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, त्याविषयी विरोधकांनी आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधकांच्या याच टीकेचा धागा पकडून पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण, भाषणाच्या ओघात त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली.

कोठे केले वक्तव्य?

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अंगावर बॉम्ब बांधून त्यांना दुसऱ्या देशात पाठवायला पाहिजे.’ मुंडे यांनी मराठवाड्यात जालन्यातील सभेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंडे म्हणाल्या, ‘आमच्या जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही एयर स्ट्राइक केला. पण, काही लोक विचारत आहेत. की, त्या एअर स्ट्राइकचे पुरावे काय आहेत.? मला असं वाटतं की, राहुल गांधी यांच्यावर अंगावर बॉम्ब बांधून त्यांना दुसऱ्या देशात पाठवायला हवे. तेव्हा त्यांना लक्षात येईल.’ यापूर्वी पंकजा मुंडे अनेकदा वादात सापडल्या आहेत. चिक्की घोटाळ्याबाबत देखील त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. पण त्या प्रकरणात त्यांना क्लीन चीट मिळाली होती.

 

 

बीडची लढत सोपी नाही?

पंकजा मुंडे यांचे राहुल गांधी यांच्याविषयीचे विधान आक्षेपार्ह मानले जात आहे. राजकारणात एक शिष्टाचार पाळून टीका करावी, अशी अपेक्षा असते. मात्र, भाषणाच्या ओघात मंत्री मुंडे शिष्टाचार विसरल्याची टीका होत आहे. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाच्या सदस्य आहेत. त्यांच्याकडे फडणवीस सरकारमध्ये महिला तसेच ग्राम विकास खात्याची जबाबदारी आहे. त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीडमधून एकतर्फी विजय मिळवला होता. आता प्रीतम मुंडे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. बीडचा सामना २०१४ आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकी इतका सोपा नाही, अशी सध्या संपूर्ण बीडमध्ये चर्चा सुरू आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडे भरकटल्या; केलं वादग्रस्त वक्तव्य Description: Lok Sabha 2019 : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अंगावर बॉम्ब बांधून त्यांना दुसऱ्या देशात पाठवायला पाहिजे, असं वादग्रस्त विधान करून महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
Loading...
Loading...
Loading...