Lok Sabha 2019 : ‘अन्यथा महाडिकांना प्रचार बंद करावा लागेल!’; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 13:45 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'माझ्या विषयीची अफवा बंद करा नाही तर, तुम्हाला प्रचार बंद करावा लागेल,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना दिलाय.

don't spread rumors about me chandrakant patil warns mp dhananjay mahadik in kolhapur
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार महाडिकांना इशारा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • लोकसभेची कोल्हापुरातील निवडणूक रंगतदार स्थितीत
  • महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार महाडिकांना इशारा
  • 'माझ्यावरच्या अफवा बंद करा, अन्यथा प्रचार बंद करावा लागेल'

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील अंतगर्त दुहीमुळे रंगतदार होत असलेल्या कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने आणखीनच रंगत भरली आहे. ‘माझ्याविषयी सुरू केलेला अपप्रचार बंद करा अन्यथा, असा बॉम्ब फोडेन की, खासदार धनंजय महाडिक यांना प्रचार बंद करावा लागेल,’ असे वक्तव्य काल, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे महाडिकांविषयी असा कोणता बॉम्ब आहे, याचीच चर्चा सध्या कोल्हापुरात रंगू लागली आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक रिंगणात आहेत तर, शिवसेना, भाजप, रिपाइंकडून प्रा. संजय मंडलिक निवडणूक लढवत आहे. गेल्या पाच वर्षांत खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळला नाही आण त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी तर महापालिकेत भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडीशी जवळीक केल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडणुकीपासून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. दोन्ही पक्षांचे अनेक नगरसेवक निवडणुकीत सक्रीय नाहीत. त्याचा फटका धनंजय महाडिक यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपशी जवळीक केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या महाडिक यांना सहकार्य करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्या चर्चेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल भुदरगड तालुक्यातील कडेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी महाडिक यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘खासदार महाडिक आणि त्यांच्या प्रचार यंत्रणेकडून माझ्याबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण, त्यांना मी सांगतो की, माझी छाती फाडली तरी, त्यामध्ये फक्‍त धनुष्यबाण व प्रा. संजय मंडलिकच दिसतील. त्यामुळे महाडिकांनी चुकीच्या बातम्या, अफवा पसरवायचा धंदा बंद करावा. तसे केले नाही तर, असा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना यापुढे प्रचारच बंद करावा लागेल.’

‘युतीच्या कामाचे श्रेय का घेता?’

खासदार धनंजय महाडिक ज्या कामांची यादी मतदारांपुढे ठेवत आहेत ती काम भाजपने केल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘खासदार धनंजय महाडिक यांनी मी कोल्हापुरात विमान आणले, शिवाजी पुलाचे काम मार्गी लावले, असा दावा करत आहेत. पण, आघाडी शासनाने केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही.’ पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याने मात्र, निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे. जिथं, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय जाहीर केला असून, ‘आमचं ठरलंय’ची घोषणा दिली आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील यांच्या बॉम्बची भर पडली आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : ‘अन्यथा महाडिकांना प्रचार बंद करावा लागेल!’; चंद्रकांत पाटील यांचा इशारा Description: Lok Sabha 2019 : कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'माझ्या विषयीची अफवा बंद करा नाही तर, तुम्हाला प्रचार बंद करावा लागेल,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना दिलाय.
Loading...
Loading...
Loading...