Lok Sabha 2019 : काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे 'राजा माणूस'; जाणून घ्या संपत्ती

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 17:35 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील आहेत. ‘राहुल ब्रिगेड’मधील महत्त्वाचे नेते असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे डोळे दीपवणारी वडिलोपार्जित संपत्ती आहे.

jyotiraditya shinde has huge property
काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे अब्जाधीश उमेदवार  |  फोटो सौजन्य: Times Now

शिवपुरी (मध्य प्रदेश) : ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशातील गुणा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचे आकडे सर्वसामान्यांचे डोळे दीपवणारे आहेत. वडिलोपार्जित महाल, व्यक्तिगत तीन कोटी रुपयांची बँकेतील गुंतवणूक आणि घरातील बीएमडब्ल्यू कार अशी अफाट संपत्ती असणारे शिंदे देशातील श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत.

अबब...केवढीही संपत्ती

ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुणा-शिवपुरी लोकसभा मतदारसंघातून शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिंदे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संपत्तीची माहिती देताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शिंदे घराणे ग्वाल्हेरचे संस्थानिक होते. शिंदे यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये ग्वाल्हेरमधील ४० एकरातील 'जय विलास पॅलेस'चाही समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात श्रीगोंदामध्ये १९ एकर आणि मूळ गाव लिंबन येथे ५३ एकर जमीन आहे. त्याशिवाय राणी महल, हिरनवन कोठी, रॅकेट कोर्ट, शांतिनिकेतन, छोटी विश्रांती, विजय भवन, पिकनिक स्पॉट, बूट बंगला, रेल्वे कॅरेज घंटी घर, इलेक्ट्रिक पॉवर हाऊस, रोशनी घर अशी खूप मोठी स्थावर मालमत्ता आहे. सध्या या स्थावर मालमत्तेची किंमत दोन अब्ज ९७ कोटी आहे.

ज्योतिरादित्य शिंदे पाचव्यांदा गुणा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे ३ कोटी ८७ लाख बँकांमध्ये संपत्ती आहे. तर ३ कोटी ३३ लाख रुपये रोख कॅश आहे. त्यांनी दाखल केलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्यांची वर्षिक मिळकत १ कोटी ५१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी राजे यांची वार्षिक मिळकत २ लाख ५० हजार आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांची मुंबईत दोन घरे असून, त्यांची बाजारातील किंमत ३१ कोटी रुपये आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे २ हजार ग्रॅमचे सोन्याचे दागिने आहेत. त्यात गोल्ड कप आणि इतर दागिन्यांचाही समावेश आहे. त्याची किंमतच सध्या ८ कोटी ६८ लाख होते. शिंदे यांच्याकडे १९६०ची बीएमडब्लूदेखील आहे.

श्रीमंत आणि उच्चशिक्षितही

ज्योतिरादित्य शिंदे केवळ श्रीमंत उमेदवार नाहीत तर, उच्चशिक्षितही आहेत. त्यांचे शिक्षण अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात झाले आहे. अर्थशास्त्रात पदवी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मोदी लाटेतही विजय

देशात २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांची खूप मोठी लाट होती. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला चारी मुंड्या चित व्हावे लागले होते. राजस्थानमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. मध्यप्रदेशात मात्र २९ पैकी दोन जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. त्यात छिंदवाडामध्ये कमलनाथ आणि गुणा मतदारसंघामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे मोदी लाटेतही विजय खेचून आणणारा नेता म्हणून शिंदे यांची ओळख आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे 'राजा माणूस'; जाणून घ्या संपत्ती Description: Lok Sabha 2019 : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील आहेत. ‘राहुल ब्रिगेड’मधील महत्त्वाचे नेते असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे डोळे दीपवणारी वडिलोपार्जित संपत्ती आहे.
Loading...
Loading...
Loading...