Lok Sabha 2019 : राज ठाकरेंची मुंबईत सभा निश्चित! कधी? कोठे होणार सभा?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 21:55 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : मुंबईत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झालेला असताना, आता राज यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २३ एप्रिलला काळाचौकी येथे त्यांची मुंबईतील पहिली सभा होईल.

raj thackeray got permission for rally
राज ठाकरेंची २३ एप्रिलला मुंबईत पहिली सभा   |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई : राज्यभरात आपल्या सभांनी भाजपला घाम फोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील जाहीर सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २३ एप्रिलला राज ठाकरे यांची मुंबईत पहिली जाहीर सभा होणार हे निश्चित झाले आहे. गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांची मुंबईत सभा होणार की नाही, यावरून संभ्रम निर्माण झाला होता. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

राज ठाकरेंच्या सभेला आडकाठी?

राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमदेवार रिंगणात उतरवला नाही. पण, राज्यभर जाहीर सभा घेऊन त्यांनी भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, महाड येथील जाहीर सभांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. त्यामुळे राज यांची मुंबईत कधी आणि कोठे सभा होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. पण, मुंबई महापालिकेतून राज यांच्या सभेला आडकाठी केली जात असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला होता.

अखेर पहिली सभा निश्चित

मनसेने राज यांच्या सभेसाठी २४ एप्रिलची मागणी केली होती. पण, पालिकेने २३ एप्रिलला परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगळवारी (२३ एप्रिल) मुंबईत काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ धडाडणार आहे. यासभेतही राज ठाकरे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा समाचार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी किती सभा होणार?

मुंबईत महापालिकेने राजकीय सभांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. पण, राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी टोलवा टोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत होता. त्यामुळे राज यांची मुंबईत सभा होणार की नाही, अशी चर्चा रंगली होती. राज यांनी १८ एप्रिल रोजी सभा घेण्याचं नियोजन केलं होतं. पण, मनसेचा उमेदवार निवडणुकीत उभा नाही. त्यामुळे सभेबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. पण, महापालिकेच्या एकखिडकी योजनेत आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून टाळण्यात आले होते. मनसे नेते संजय नाईक यांनी ही माहिती दिली. राज ठाकरे जेथे सभा घेण्याचे नियोजन करत आहेत. तेथील मैदाने आधीच सभेसाठी आरक्षित करण्याची चाल शिवसेनेकडून खेळली जात होती. शिवडीतील सगळी मैदाने अशीच शिवसेनेकडून आरक्षित करण्यात आली. त्यामुळं १८ एप्रिलची राज यांची सभा रद्द झाली आता. २३ एप्रिलला राज यांची पहिली सभा होत आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मुंबईत मतदान होत आहे. त्यात्पूर्वी राज ठाकरे मुंबईत आणखी तीन सभा घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : राज ठाकरेंची मुंबईत सभा निश्चित! कधी? कोठे होणार सभा? Description: Lok Sabha 2019 : मुंबईत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झालेला असताना, आता राज यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २३ एप्रिलला काळाचौकी येथे त्यांची मुंबईतील पहिली सभा होईल.
Loading...
Loading...
Loading...