Lok Sabha 2019: आदल्यादिवशीच मतदारांच्या बोटांवर लावली शाई; भाजपवर धक्कादायक आरोप

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 22:07 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019: मतदारांच्या बोटांवर आदल्यादिवशीच शाई लावण्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. हा प्रकार सातव्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या रात्री (शनिवारी १८ मे) करण्यात आला. याची चौकशी सुरू आहे.

voting ink allegation uttar pradesh
मतदारांच्या बोटांवर आदल्या दिवशीच शाई   |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली: निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराचे मतदान तोडण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. पण, प्रतिस्पर्ध्यांचे संभाव्य मतदान असलेल्या मतदारांच्या बोटांवर आदल्या दिवशीच शाई लावण्याचा अजब प्रकार उत्तरप्रदेशात उघडकीस आला आहे. हा प्रकार सातव्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या रात्री (शनिवारी १८ मे) करण्यात आला आहे. गावकऱ्यांना वेळीच तो हाणू पाडला. आता त्यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सबंधित मतदारांना आजच्या मतदान प्रक्रियेत भाग घेता येऊ नये, यासाठी हा शाई लावण्याचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. हा आघाडीने भाजप कार्यकर्त्यांवर याप्रकरणी आरोप केला असून, पोलिसांनीही त्यात लक्ष घातले आहे. शाई लावणारे पळून गेले असले तरी, या प्रकाराची उत्तर प्रदेशातच नव्हे तर, देशभरात सध्या चर्चा सुरू झाली आहे.

दलित वस्तीत घडला प्रकार

उत्तरप्रदेशात चंदौली लोकसभा मतदारसंघात आज, १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होते. पण, मतदारसंघात काही मतदारांच्या बोटांवर आदल्या दिवशी रात्रीच शाई लावण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण, तोपर्यंत शाई लावण्यासाठी आलेले कार्यकर्ते पळून गेले. संबंधित गावातील नागरिकांना एका वस्तीवर खूप गर्दी झाल्याचे कळाल्यानंतर संशय आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. चंदौली मतदारसंघातील अलीनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या ताराजीवनपूर गावातील दलित वस्तीत हा प्रकार घडला आहे. या वस्तीमध्ये पैसे वाटण्याचे काम सुरू असल्याचा संशय महाआघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकाराचा संशय येताच त्या गावातील आणि आसपासच्या गावातील नागरिकही त्या वस्तीजवळ आले होते. दंगा होण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर शाई लावण्यासाठी आलेले कार्यकर्ते पळून गेले. महाआघाडीने याची गंभीर दखल घेतली आणि गावातील नागरिकांनी अलीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले. दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजपवर आरोप

भाजपचे कार्यकर्ते तसेच एका माजी आमदार त्यांच्या काही समर्थकांना घेऊन दलित वस्तीमध्ये आले होते. तेथील मतदारांना पाचशे रुपये हातांवर ठेवून बोटांवर मतदानाची शाई लावत होते. शाई लावण्यापूर्वी ते मतदारांना भाजपला मतदान करणार काय? असे विचारत होते. तसेच आता तुम्हाला मतदानच करता येणार नाही, असे सांगून बोटांवर शाई लावत होते. या प्रकाराची कोठेही वाच्यता न करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. माहिती मिळाल्यानंतर मंडल अधिकारी त्रिपुरारी पांड्ये यांनी सुरक्षा दलासह घटनास्थळी भेट दिली. मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊच नये, यासाठी बोटांना शाई लावली जात होती आणि त्यासाठी पैसेही दिले जात होते. पोलीस या प्रकाराची कसून चौकशी करत असल्याचे पांड्ये यांनी सांगितले. महाआघाडीचे उमेदवार डॉ. संजय चौहान, सकलडीहाचे आमदार प्रभू नारायम सिंह यादव यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. अलीनगर पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्याच नेतृत्वाखाली धरणे आंदोलन झाले. यानंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात निवासी उप जिल्हाधिकारी के. आर. हर्ष यांनी सांगितले की, तक्रारदारांच्या माहितीनुसार कारवाई केली जाईल. मतदान ईव्हीएममधून होते हातांच्या बोटांवरील शाईने नाही. मतदारांच्या बोटांवर जबरदस्तीने शाई लावली जात होती का? हे तपासावं लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019: आदल्यादिवशीच मतदारांच्या बोटांवर लावली शाई; भाजपवर धक्कादायक आरोप Description: Lok Sabha 2019: मतदारांच्या बोटांवर आदल्यादिवशीच शाई लावण्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. हा प्रकार सातव्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या रात्री (शनिवारी १८ मे) करण्यात आला. याची चौकशी सुरू आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles