Lok Sabha 2019 : कोल्हापुरात कोण म्हणतंय ‘आपलं ठरलंय’? त्यांना पवार काय म्हणाले?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 16, 2019 | 08:00 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय. ही निवडणूक एकतर्फी नसून, अतिशय चुरशीची होत आहे. गटातटाच्या राजकारणात कोण कोणाला मतदान करणार याचा केवळ अंदाज बांधला जात आहे.

lok sabha election kolhapur aapal tharlay campaign is viral on social media
कोल्हापुरात चर्चा केवळ 'आपलं ठरलंय'चीच   |  फोटो सौजन्य: Times Now

कोल्हापूर : गटातटाच्या राजकारणामुळे दरवेळी गाजणारी कोल्हापूरची निवडणूक यंदा थोडी जास्तच लक्षवेधी ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि काँग्रेसमधून त्याला मिळणारी फोडणी यामुळे कोल्हापूरच्या प्रचारात रंगत भरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या पाठिशी तर, भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक राष्ट्रवादी उमेदवारासोबत दिसत आहे. त्यामुळे कोण कुठला? कोणाचा? तुमचा की आमचा? असा गोंधळ सध्या प्रचारात दिसतोय. या सगळ्यात ‘आपलं ठरलंय’ या कॅम्पेनची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.

‘आपलं ठरलंय’ म्हणजे काय?

कोल्हापूरचे राजकारण सध्या विद्यामान खासदार धनंजय महाडिक, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याभोवती फिरत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या बाजूने निकाल लागला. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची साथ मिळाल्यानेच खासदार महाडिक यांना ही किमया साधता आली, असा दावा पाटील आणि मुश्रीफ यांच्या गटांकडून होतो. तर, विजय महाडिक गटामुळे आणि धनंजय महाडिक यांच्या करिष्मामुळे झाला, असं महाडिक गटाचं म्हणणं आहे. पण, २०१४मध्येच विधानसभा निवडणुकीत सगळी गणिते बदलली. आमदार सतेज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात खासदार महाडिक यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली. सतेज पाटील यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाची सल घेऊनच त्यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकारण केले. “विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांनी आपल्याला मदत केली नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना मदत करायची नाही. हे आता ‘आपलं ठरलंय’,” अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यामुळं आमदार पाटील यांची सगळी रसद शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठिशी पुरवली जात आहे. सतेज पाटील यांच्या ‘आपलं ठरलंय’ला महाडिक गटाकडून 'जनतेचं ठरलंय' असं उत्तर देण्यात आलंय.

विधानपरिषदेत महाडिकांचा पराभव

खासदार धनंजय महाडिक यांचे काका महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते. पण, त्यांच्या चिरंजीवांनी (अमल महाडिक) भाजपच्या तिकिटावर विधानसभेला काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे २०१५च्या विधानपरिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. महादेवराव महाडिक अपक्ष रिंगणात आले. त्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेतील संख्याबळाच्या जोरावर सतेज पाटील यांनी महाडिक यांचा पराभव केला.

सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक  

खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात, काका महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीसाठी काम केल्याचा आरोप आमदार सतेज पाटील करत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक भाजप सदस्यांची बस चालवत जिल्हा परिषदेत आले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांचा पराभव झाला. त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि खासदार महाडिक यांच्या भावजया (आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा) शौमिका महाडिक निवडून आल्या आणि जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली. या भूमिकेमुळे सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांना मदत न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लोकसभेची निवडणूक धनंजय महाडिक विरुद्ध प्रा. संजय मंडलिक अशी आहे. पण, एकूण प्रचार पाहिला तर, ती धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशीच वाटू लागली आहे.

पवार म्हणतात, ‘मी बी ध्यानात ठेवलंय’

खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा तिकिट देऊ नये, अशी भूमिका राष्ट्रवादीतल्याच काही स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांच्यापुढे मांडली होती. तर, आमदार सतेज पाटील यांनी ‘हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, उमेदवार आम्ही देऊ,’ असे म्हटले होते. पण, शरद पवार खासदार महाडिक यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. उमेदवारी धनंजय महाडिक यांनाच मिळाली. पण, आमदार सतेज पाटील यांनी ‘आपलं ठरलंय’, असं सांगत महाडिक यांच्या विरोधी भूमिका जाहीर केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असूनही आमदार सतेज पाटील महाडिक यांच्या प्रचारात नाहीत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही महाडिकांच्या प्रचारापासून फारकत घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन-तीन वेळा कोल्हापूरचा दौरा केला. त्यात सतेज पाटील आणि शरद पवार यांची भेट होऊन महाडिक-पाटील पॅचअप होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण, पवार यांनी आमदार पाटील यांची फारशी दखल घेतली नाही. पण, दौरा संपवून जाता हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी त्यांनी पेठवडगाव येथे जाहीर सभा घेतली होती. त्यात त्यांनी ‘आपलं ठरलंय’ या भूमिकेचा उल्लेख करून ‘आता मी बी ध्यानात ठेवलंय’, असा इशारा सतेज पाटील यांचं नाव न घेता दिला. त्यामुळं सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चर्चा ‘आपलं ठरलंय’ या कॅम्पेनचीच आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : कोल्हापुरात कोण म्हणतंय ‘आपलं ठरलंय’? त्यांना पवार काय म्हणाले? Description: Lok Sabha 2019 : कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय. ही निवडणूक एकतर्फी नसून, अतिशय चुरशीची होत आहे. गटातटाच्या राजकारणात कोण कोणाला मतदान करणार याचा केवळ अंदाज बांधला जात आहे.
Loading...
Loading...
Loading...