Kirit Somaiya: अखेर किरीट सोमय्या यांचा पत्ता कट, 'या' उमेदवाराला भाजपने दिलं तिकीट! 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 03, 2019 | 18:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक २०१९ साठी भाजपने ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा पत्ता आता कट झाला आहे.

kirit somaiya_twitter
अखेर किरीट सोमय्या यांचा पत्ता कट!  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९ साठी भारतीय जनता पक्षाने आपली सोळावी यादी आता जाहीर केली आहे. या यादीत भाजपने एक अतिशय आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. या यादीत भाजपने लोकसभेसाठी ईशान्य मुंबईचा उमेदवार जाहीर केला आहे. या मतदरासंघातून भाजपाने मुंबई महापालिकेत नगरसेवक असलेले मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचा हा निर्णय विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना मोठा धक्का आहे. कारण पक्षाच्या या निर्णयामुळे सोमय्यांचा पत्ता कट झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेनेवर केलेली जहरी टीका सोमय्यांना भोवली असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

शिवसेना-भाजपची युती झाल्यापासून ईशान्य मुंबईच्या उमेदवारीबाबत बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु होत्या. कारण, युती झाली असली तरी शिवसेनेने किरीट सोमय्या यांना विरोध केला होता. त्यामुळे भाजपसमोर बराच पेच निर्माण झाला होता. अखेर भाजपने आज (बुधवार) मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करत सोमय्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

 

मनोज कोटक (फोटो सौजन्य: @twitter)

मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर 

भाजपने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जागांवरील उमेदवार जाहीर केले होते. पण ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा कायम होता. त्याला कारण म्हणजे शिवसेनेचा किरीट सोमय्यांना असणारा विरोध. ईशान्य मुंबई ही जागा भाजप जिंकण्याची सर्वाधिक शक्यता आहे. अशावेळी सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेनं नक्कीच दगा फटका केला असता. त्यामुळेच भाजपने इथं धोका न पत्करता मनोज कोटक यांना उमेदवारी देऊ केली. 

किरीट सोमय्यांना राज्यसभेची खासदारी मिळणार? 

दरम्यान, असं असलं तरी किरीट सोमय्या यांचं पक्षाकडून पुनर्वसन केलं जाऊ शकतं. सोमय्यांना पक्ष श्रेष्ठींकडून राज्यसभेची खासदारकी दिली जाऊ शकते. अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे. 

शिवसेनेकडून मनोज कोटक यांच्या नावाला पाठिंबा

दुसरीकडे मनोज कोटक यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं समजतं आहे. मनोज कोटक हे भांडुपमधून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. तसेच ते महापालिकेत भाजपचे गट नेतेही आहेत. मनोज कोटक हे मुलुंडचे रहिवासी असल्यानेच किरीट सोमय्यांच्या ऐवजी त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला. तसंच शिवसेनेच्या अनेक नेत्यांशीही कोटक यांचे चांगले संबंध असल्यामुळे शिवसेनेकडून इथे मदत होऊ शकते. 

भाजपकडून या जागेसाठी अनेक नावांची चाचपणी झाली होती. यामध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, पराग शहा, प्रविण छेडा आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या नावाची चर्चा होती. पण या सगळ्या मागे टाकत अखेर मनोज कोटक यांनीच बाजी मारली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी