चंद्रकांत पाटील राजू शेट्टींवर बरसले, शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्यांची साथ कशी देता? विचारला सवाल

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 18, 2019 | 23:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे आटोपले आहेत. आता पुढील टप्प्यांसाठीच्या मतदानासाठी प्रचार सुरू आहे. महायुतीच्या प्रचारासाठी हातकणंगले इथं बोलत असताना कृषिमंत्री चंद्रकांत पाटील राजू शेट्टींवर बरसले.

Chandrakant Patil slams Raju Shetty
चंद्रकांत पाटील यांची राजू शेट्टींवर टीका  |  फोटो सौजन्य: BCCL

कुंभोज, हातकणंगले: लोकसभा निवडणूक २०१९च्या प्रचारात दिवसेंदिवस रंगत येतेय. राज्यातील एकूण १७ मतदारसंघात मतदान झालेलं आहे. ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघ आणि १८ एप्रिलला १० मतदारसंघात मतदान पार पडलं. आता राज्यात २३ आणि २९ एप्रिलला मतदान होणार आहे. पुढील दोन टप्प्यातील मतदानासाठी आता प्रचारानं जोर धरलाय. राज्याचे कृषिमंत्र्यांनी हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राजू शेट्टींवर हल्ला चढवला. सरकारमध्ये असतांना शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पक्षाला साथ कशी काय देता? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

राजू शेट्टी हे स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणतात. शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतात. मग आता  मावळमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान याच आघाडी सरकारनं शेतकऱ्यांवर गोळीबार करत त्यांचं रक्त सांडवलं होतं. त्या आघाडी सरकारला राजू शेट्टींनी पाठिंबा दिलाय. आता याच आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत राजू शेट्टी त्यांना ‘रेडा’ म्हणाले होते. आता हेच शेट्टी पवारांचे गोडवे गात आहेत. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या कामगिरीबद्दल बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागली नाही, असं म्हणाले. मोदी सरकारनं सुरू केलेल्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळत असल्याचंही चंद्रकांतदादा म्हणाले. देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र काम करत आहेत, त्यासाठीच पुन्हा मोदी सरकारला निवडून देण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी जनतेला केलं.

महायुतीच्या धैर्यशील माने यांचा सामना हातकणंगलेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत आहे. इथं २३ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वी राजू शेट्टींचा प्रचार करण्यासाठी बॉलिवूड आणि तमिळ इंडस्ट्रीतील अभिनेते प्रकाश राज हे हातकणंगले इथं येणार आहे. राजू शेट्टींच्या प्रचारासाठी ते इथं सभा घेणार आहेत. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलनं आणि ऊसपट्ट्यांसाठी केलेलं काम यामुळे त्यांचं या भागात वर्चस्व आहे. एरव्ही विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा पराभव किंवा विजय होवो पण लोकसभेत मात्र राजू शेट्टी नेहमी वरचढ होतांना दिसतात.

आता राजू शेट्टी आपल्या सभेत चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नावर काय उत्तर देतात, हे बघावं लागेल.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
चंद्रकांत पाटील राजू शेट्टींवर बरसले, शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्यांची साथ कशी देता? विचारला सवाल Description: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे आटोपले आहेत. आता पुढील टप्प्यांसाठीच्या मतदानासाठी प्रचार सुरू आहे. महायुतीच्या प्रचारासाठी हातकणंगले इथं बोलत असताना कृषिमंत्री चंद्रकांत पाटील राजू शेट्टींवर बरसले.
Loading...
Loading...
Loading...