काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप समर्थकांनं दाखवला तिरंगा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 15, 2019 | 19:08 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. भाजप समर्थकानं काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांच्या पत्रकार परिषदेत हातात तिरंगा घेऊन आपला विरोध दर्शवला. तसंच मोदी-शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावरील टीकेवर उत्तर दिलं.

Congress PC
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली :  काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत आज चांगलाच गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. तिथं एक व्यक्ती अचानक पत्रकारांसमोर भारताचा राष्ट्रध्वज घेऊन उभा राहिला. या व्यक्तीनं काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांच्या पत्रकार परिषदेत घुसखोरी केली आणि पवन खेडांचं बोलणं थांबवलं. तो म्हणाला, ‘योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे.’ आपलं म्हणणं मांडत त्यानं ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घालणाऱ्या या व्यक्तीचं नाव नचिकेत वाल्हेकर आहे आणि तो महाराष्ट्रातील रहिवासी आहे. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय. पत्रकारांसमोर बोलतांना तो म्हणाला, ‘यांची ममता बॅनर्जींचं नाव घ्यायची हिंमत होत नाही. यांना निवडणुका लढता येत नाहीयेत. हे लोक फक्त मोदी-शहा, मोदी-शहा करत आहेत. मोदी-शहा यांनी देशासाठी खूप काही केलं आहे.’

तर काँग्रेसनं या घटनेला योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता न येणं आणि लोकसभेत होत असल्याला पराभवातून आलेलं नैराश्य म्हटलं आहे.

 

 

मंगळवारी रायबरेली इथं काँग्रेसच्या आमदार अदिती सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलण्यासाठी पवन खेडांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती. यात बोलतांना पवन खेडा म्हणाले, ‘उत्तरप्रदेशात जी हिंसा झाली, आमच्या आमदारावर जीवघेणा हल्ला झाला. आज प्रियंकाजी तिथं गेल्या होत्या. ही हिंसा म्हणजे मोदी-शहा मॉडेल आहे. मोदी-शहा यांचं हे मॉडेल पश्चिम बंगालमध्येही पण बघायला मिळतंय आणि हे यूपीतही आलं आहे.’

‘ज्या पद्धतीनं उत्तरप्रदेशात आमदार सुद्धा सुरक्षित नाहीत, हे अजय सिंह बिष्ट आणि मोदी-शहा मॉडेल आहे. त्यानुसार विचार करा सामान्य नागरिकांची काय स्थिती होत असेल. राज्यातील कायदा-सुव्यस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. संपूर्ण देश फिरत आहेत, पण आपलं घर यांना सांभाळता येत नाही’, अशी टीका करत पवन खेडा यांनी योगी आदित्यनाथांनाही टोला लगावला.  मोदी-शहा यांच्या या मॉडेलला आता फक्त ८-९ दिवस शिल्लक आहेत. जे ५ वर्षात काही करून दाखवू शकले नाही, ते हे लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पवन खेडा यांनी केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी