२०१४ मध्ये मोदी ‘लाट’ पण यावेळी मोदींची ‘त्सुनामी’ दिसली : मुख्यमंत्री

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 15:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहीर होतोय. निकालातून भाजपप्रणित एनडीएचं सरकार पुन्हा स्थापन होणार, असं चित्र स्पष्ट होताना दिसतंय.

Devendra Fadanvis
मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक २०१९ मधील भाजप आणि मित्रपक्षांच्या विजयासाठी जनतेचे आभार मानले आहेत. जनतेनं पुन्हा एकदा मोदी सरकारवर विश्वास दाखवला असून, आता उद्यापासून पुन्हा जोमानं कामाला सुरूवात करायची, असं मुख्यमंत्री म्हणाले. २०१४ साली नरेंद्र मोदींची लाट होती, म्हणून इतका मोठा विजय मिळाला, असं म्हटलं गेलं. मात्र यंदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट नाही तर त्सुनामी बघायला मिळाली, असं मुख्यमंत्री म्हणाले. देशात यावेळी मोदींच्या बाजूनं सायलेंट वेव्ह आहे. देशातील जनता मोदींना निवडून देण्यास तयार असल्याचं दिसून आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

देशात आणि राज्यात भाजपच्या विजयामध्ये मित्रपक्षांची मोठी मदत झाली. आम्ही मित्रपक्षांना मदत केली आणि मित्रपक्षांनी आम्हाला चांगली मदत केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेसह सर्वच मित्रपक्षांचा चांगला पाठिंबा मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

देशात नेहमी सरकारविरोधात लाट असल्याचं बघायला मिळतं. मात्र इतिहासात पहिल्यांदाच सरकारच्या विरोधात नाही तर सरकारच्या बाजूनं एवढा प्रंचड कौल जनतेनं दिला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. जनतेनं भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय. मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय.

 

महाराष्ट्रात आमच्या युतीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मागच्या वेळीस आम्ही ४१ जागा जिंकल्या होत्या. यावेळेस त्याहीपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर दुष्काळासारख्या समस्यातून आपल्याला युतीचं सरकार बाहेर काढू शकेल असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळंच आमच्यावर विश्वास दाखवल्याचंही ते म्हणाले.

भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारचा हा आजचा विजय पाहून आता विरोधकांची झोप उडाली असेल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून विरोधकांना चिमटा घेतलाय. तसंच आता मोठ्या उत्साहानं पुन्हा कामाला लागा, असं भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना सांगत मुख्यमंत्र्यांनी विधान सभा निवडणुकीसाठी तयार राहा, असे संकेत दिलेत. राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहनं सुरू होईल. २०१४ साली दिवाळी पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आलं होतं. आता लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वेध सुरू झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीतील राज्यातील निकाल

लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल लागण्यास सुरूवात झालीय. राज्यात ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजप आणि १८ जागांवर शिवसेनेनं आघाडी मिळवलीय. प्रस्थापितांना मोठा फटका बसतांना दिसतोय. शिवसेनेचे जुने खासदार पराभूत होतांना दिसतायेत. औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे, रायगडमधून अनंत गीते आणि शिरूर इथून आढळराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. सोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण हे सुद्धा पराभूत झाले आहेत. भाजपच्या कांचन कूल यांना बारामतीमधून पराभव स्वीकारावा लागलाय. 

मुंबईत संपूर्ण सहाही जागांवर भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर दिसतायेत. वंचित बहुजन आघाडीचा कुठे भाजपला फायदा तर औरंगाबादेत शिवसेनेला फटका बसल्याचं दिसून येतंय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
२०१४ मध्ये मोदी ‘लाट’ पण यावेळी मोदींची ‘त्सुनामी’ दिसली : मुख्यमंत्री Description: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहीर होतोय. निकालातून भाजपप्रणित एनडीएचं सरकार पुन्हा स्थापन होणार, असं चित्र स्पष्ट होताना दिसतंय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles