निवडणूक निकाल लागताच मोदींनी हटवलं नावासमोरचं ‘चौकीदार’!

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:42 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल जाहीर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या नावासमोरील ‘चौकीदार’ हा शब्द काढून टाकलाय. मोदींनी यावेळी एक संदेशही दिलाय.

Narendra Modi
मोदींनी ट्विटरवरील चौकीदार शब्द काढला  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती ‘चौकीदार’ या शब्दाची. आता लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप आणि एनडीए सरकारलाच पुन्हा एकदा जनतेनं कौल दिलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून ‘चौकीदार’ हा शब्द हटवला आहे. मात्र आपल्या ट्विटरवरुन चौकीदार शब्द काढण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत, हा शब्द नेहमी आपल्या व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य भाग असेल, असं म्हटलंय. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘आता ती वेळ आलीय की चौकीदाराच्या भावनेला आता पुढल्या टप्प्यावर घेऊन जावं.’

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं, ‘ही भावना प्रत्येक क्षणी जिवंत राहावी, यासाठी भारताच्या प्रगतीचं काम असंच पुढे सुरू राहील. माझ्या ट्विटर हँडलवरुन चौकीदार शब्द काढतोय, पण हा माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असेल. आपल्या सर्वांना सुद्धा मी हीच विनंती करतो.’

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएच्या घटकपक्षांना मिळून तब्बल ३५० चा आकडा गाठता येईल, असे आतापर्यंतचे कल सांगतायेत. ज्यातील एकट्या भाजपला ३०० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

लोकसभा निवडणूक प्रचारात ‘चौकीदार’ हा शब्द खूप चर्चेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला देशाचा प्रधानसेवक, देशाचा चौकीदार म्हटलं होतं. त्यानंतर राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’ म्हणत भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र त्याच शब्दाला मोदींनी आपलं शस्त्र बनवलं आणि मै चौकीदार म्हणत आपल्या नावासमोर ‘चौकीदार’ शब्द लावला होता.

पंतप्रधानांनी चौकीदार शब्द आपल्या नावासमोर लावताच पक्षातील अनेक मंत्री आणि नेते, कार्यकर्त्यांनीही आपल्या नावासमोर चौकीदार शब्द लावला. पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना, नेत्यांना तसं आवाहनच केलं होतं.

मात्र आता निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, मोदींनी आपल्या नावासमोरचा चौकीदार शब्द काढून टाकला आहे. तसंच ज्यांनी ज्यांनी आपल्या नावासमोर चौकीदार शब्द वापरलाय, त्यांनाही तो काढण्याचं आवाहन केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशातील जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. २०१४ पेक्षा ही जास्त बहुमतानं एनडीएचं सरकार स्थापन होणार असल्याचं चित्र सध्याची आकडेवारी दर्शवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीहून प्रचंड बहुमतानं विजयी झाले आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
निवडणूक निकाल लागताच मोदींनी हटवलं नावासमोरचं ‘चौकीदार’! Description: लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल जाहीर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या नावासमोरील ‘चौकीदार’ हा शब्द काढून टाकलाय. मोदींनी यावेळी एक संदेशही दिलाय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles