काँग्रेससाठी ‘प्रियंका’ अस्त्रही ठरलं निष्प्रभ, बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा पराभव

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 08:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Lok Sabha Result 2019: काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत आपलं ट्रम्प कार्ड म्हणून काँग्रेसनं प्रियंका गांधींना मैदानात उतरवलं होतं. मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेसचं अस्त्र निष्प्रभ ठरल्याचं दिसतंय.

Priyanaka Gandhi
प्रियंका गांधी उत्तरप्रदेशात ठरल्या निष्प्रभ 

लखनौ: उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं आपल्यातील ४० वर्षांचा वाद विसरून आघाडी केल्यानंतर काँग्रेसनं आपलं ट्रम्प कार्ड म्हणून प्रियंका गांधींना सक्रीय राजकारणात उतरवलं. मात्र २०१४ मधील भाजपची जादू उत्तर प्रदेशातील जनतेच्या मनातून आणि मतांमधून काँग्रेसला काढता आली नाही, असंच चित्र सध्या दिसतंय. उत्तर प्रदेशात तब्बल ६० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतांना दिसत आहेत. प्रियंका गांधी यांनी गांधी कुटुंबाच्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात जातीनं लक्ष दिलं. आई आणि भावाच्या प्रचारासाठी प्रियंका कंबर कसून कामाला लागल्या होत्या. मात्र आपला बालेकिल्ला राखण्यात त्यांना यश आलं नाही. अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींना पराभव स्वीकारावा लागलाय.

काँग्रेसला सप-बसपनं आपल्या आघाडीत घेतलं नाही. त्यामुळे काँग्रेसनं उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधींवर दिली. प्रियंका गांधींना सक्रीय राजकारणात आणण्याचा काँग्रेसचा हा ऐतिहासिक निर्णय होता. ऐतिहासिक याकरता म्हणतोय कारण, मागील कित्येक वर्षांपासून प्रियंका गांधींनी सक्रिय राजकारणात यावं, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. मात्र तेव्हा काँग्रेसनं ही मागणी मान्य केली नाही, आणि यावेळी मात्र उत्तर प्रदेशात आपला जादू दाखविण्यासाठी काँग्रेसनं प्रियंका गांधींना उतरवलं. महासचिव झाल्यानंतर प्रियंका गांधींनी आपली ही नवीन जबाबदारी गंभीरपणे स्वीकारली. कार्यकर्ते आणि पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी उत्तर प्रदेशात दौराही केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींनी महासचिव होताच रात्री-रात्री उशीरापर्यंत नेत्यांच्या बैठका घेतल्या. खूप मेहनत करत काम सुरू केलं. प्रियंका गांधींनी गंगा यात्राही केली. या यात्रेदरम्यान त्यांनी प्रयागराज, मिर्झापूर आणि वाराणसीचा दौरा केला. यादरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या योजनांवर सजकून टीका केली.

नेहमी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघामध्ये प्रचार करणाऱ्या प्रियंका गांधींनी यावेळी उत्तरप्रदेशच्या पूर्वांचल आणि इतर शहरांमध्ये काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. प्रियंका गांधींच्या कार्यक्रम आणि सभांना गर्दीही बघायला मिळत होती. अमेठीमध्ये तर स्मृती इराणींसोबत त्यांची शाब्दिक चकमकही बघायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी प्रियंका गांधी यांनी सोडली नाही. मात्र इतकं सगळं असूनही त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचं दिसत नाही. त्यामुळे आता भविष्यात काँग्रेस नेतृत्व आणि प्रियंका गांधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जावू शकतात.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अमेठीतील अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच स्मृती इराणींचं अभिनंदन करत, स्वत:चा पराभव स्वीकारला. मात्र अद्याप प्रियंका गांधी यांची उत्तरप्रदेश आणि देशातील काँग्रेसच्या अपयशाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात राहतात की नाही, त्यांचं भविष्य काय? याबाबत आणि त्यांच्या प्रतिक्रियेबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी