Lok Sabha 2019 : भाजपकडे आता पुन्हा ढुंकूनदेखील बघू नका : राज ठाकरे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 21:41 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरवता भाजप शिवसेना युतीच्या विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरे यांची आज, सोलापुरात सभा झाली. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना लक्ष्य केले.

mns leader raj thackeray says don't vote for bjp
भाजपकडे ढुंकूनही बघू नका : राज ठाकरे   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • नरेंद्र मोदी, अमित शहा लोकशाहीची गळचेपी करतील : राज ठाकरे
  • इतका वाईट पंतप्रधान पाहिला नाही : राज ठाकरे
  • भाजपने मतदारांना गृहित धरले, जनतेला फसवले : राज ठाकरे

सोलापूर : ‘भाजपने देश लुटला. तो कसा लुटला यांची कल्पनादेखील तुम्हाला नाही. त्यांनी देश लुटला आता त्यांना लुटण्याची वेळ आलीय. या निवडणुकीनंतर भाजपकडं परत ढुंकूनही बघू नका,’ असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. सोलापुरात त्यांनी जाहीर सभा झाली.  सभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांची फसवणूक केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जाहीर सभा घेत आहेत. पण, ते २०१४मध्ये दिलेल्या आश्वासनांवर बोलत नाहीत. पाच वर्षांत त्यांनी थापा मारल्या आहेत. त्याविषयावर मोदी बोलायला तयार नाहीत. इतर विषय आपल्यापुढे मांडले जातात आणि मूळ विषयांना बगल दिली जाते.’ देशात राजीव गांधी यांच्यानंतर ३० वर्षांनंतर नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळाले होते. पण, त्यांनी खोटे बोलून देशवासियांची फसवणूक केली आहे. देशात इतका वाईट पंतप्रधान मी आजवर पाहिला नव्हता, असे राज ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी आज, पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावे मते मागत आहेत.  त्या जवानांच्या कुटंबियांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही आणि त्यांच्या नावे मते मागत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवेळीच मी सांगितले की, निवडणुकीपूर्वी हे युद्धही घडवू शकतात आणि तेच त्यांनी केलं.’ राज म्हणाले, ‘पंतप्रधानांनी एका रात्रीत नोटाबंदी केली. त्याचे परिणाम आता समोर येत आहेत. दर वर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची भाषा करणाऱ्या मोदींनी नोटाबंदीच्या निर्णायातून पाच ते सहा कोटी नागरिकांच्या नोकऱ्या घालवल्या. सोलापूर जिल्ह्यातच यंत्रमाग कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मूळ मुद्दे सोडून आरक्षणाच्या नावाखाली लोकांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. ’

मुख्यमंत्र्यांवर राज ठाकरे बरसले

महाराष्ट्रातील पहिले डिजिटल व्हिलेज असलेल्या हरिसाल गावाची सध्याची स्थिती दाखवणारा व्हिडिओ यावेळी राज ठाकरे यांनी दाखवला. त्या व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका आणि त्यानंतर पुन्हा एका चॅनेलने केलेले हरिसालचे व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आले. यातून सरकारच्या दाव्याचा  पर्दाफाश केला तसेच, डिजिटल इंडियाच्या जाहिरातीलमधील तरुणालाही व्यासपीठावर आणण्यात आलं. राज्य सरकार एक लाख २० हजार विहिरी बांधल्याचं सांगत आहे. मुख्यमंत्री कोणत्या विहिरीवर पाणी भरायला गेले होते, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. नरेंद्र मोदी, अमित शहा सत्तेत आले तर, देशातील लोकशाहीची गळचेपी होईल, असा त्यामुळे भाजपला मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज ठाकरे उवाच

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागी जगातील सर्वांत मोठी लायब्ररी उभारा
  2. केवळ पुतळे उभारून राष्ट्रपुरुषांची स्मारके उभारता येणार नाहीत
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हेच त्यांचे स्मारक; त्यांची दुरुस्ती करा
  4. मोदी सरकारकडून योजनांच्या जाहिरातींवर ४ हजार ८०० कोटी खर्च
  5. मोदी सरकारच्या योजना फसल्या केवळ त्याच्या जाहिराती गाजल्या
  6. मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीची योजना या फसलेल्या योजना

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : भाजपकडे आता पुन्हा ढुंकूनदेखील बघू नका : राज ठाकरे Description: Lok Sabha 2019 : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरवता भाजप शिवसेना युतीच्या विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरे यांची आज, सोलापुरात सभा झाली. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना लक्ष्य केले.
Loading...
Loading...
Loading...