अजित पवारांना धक्का बसणार? पार्थ पवार पराभवाच्या छायेत

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 13:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

पवार कुटुंबियांना पहिला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीय. मावळ लोकसभा मतदासंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार चांगलेच पिछाडीवर आहेत. तब्बल दीड लाख मतांनी पार्थ पवार पिछाडीवर आहेत.

Parth Pawar
पार्थ पवार पराभवाच्या छायेत  |  फोटो सौजन्य: BCCL

मावळ: लोकसभा निवडणूक २०१९ चे कल हाती येऊ लागले आहेत. अतिशय धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झालीय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात प्रतिष्ठेची जागा म्हणजे पवार कुटुंबियांकडून उभा असलेला तरुण उमेदवार पार्थ पवारची जागा होय. पार्थ पवार सध्या पराभवाच्या छायेत दिसत आहेत. मतमोजणी सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या फेरीपासूनच पार्थ पवार पिछाडीवर असल्याचं बघायला मिळालं. आता तब्बल दीड लाख मतांनी पार्थ पवार पिछाडीवर आहेत. जर पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागला तर सर्वात मोठा हा धक्का असेल तो पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांच्यासाठी.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शरद पवार यांनी लढावं, अशी मागणी केली जात होती. मात्र शरद पवार यांचा विरोध असतांनाही लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार आणि कुटुंबियांनी केलेल्या आग्रहानंतर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या मावळ मतदारसंघात पार्थ पवारच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली सगळी शक्ती पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते तिथं तळ ठोकून बसले होते. पार्थ पवार यांचा प्रचार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेतली. मात्र त्या सभेचा काहीही उपयोग न झाल्याचं सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येतंय.

अजित पवार यांच्यासाठी हा मुद्दा अतिशय प्रतिष्ठेचा बनला होता. एकतर पार्थ पवार अजित पवार यांचा मुलगा आहे. सोबतच त्यावरून पवार कुटुंबियांमधील त्यांच्या निर्णयाचं महत्त्व वाढलं असतं, असा सुद्धा अंदाज राजकारणातील काही जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र जर पार्थ पवारला आज पराभव स्वीकारावा लागला. तर अजित पवार यांनी पार्थच्या उमेदवारीसाठी केलेला संघर्ष वाया जाईल आणि त्याचा फटका विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंबियांना मिळू शकतो.

श्रीरंग बारणेंच्या घरासमोर मंडप घालण्याचे काम सुरू

सकाळपासून पार्थ पवार यांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या घरासमोर शुकशुकाट होता. अजित पवार यांच्या मुलाविरोधात निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या बारणे यांना विजयाचा विश्वास नव्हता. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून बारणेंनी पार्थ पवार विरोधात आघाडी घेतली. आता जशी-जशी बारणेंची आघाडी वाढत गेली. तसातसा शिवसैनिकांमधील उत्साह वाढत जातोय. आता श्रीरंग बारणे यांच्या विजयाची जवळपास निश्चिती झालीय. बारणे तब्बल दीड लाख मतांनी पार्थ पवार पेक्षा आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी आपला उत्साह दाखवत बारणे यांच्या घरासमोर मंडप घालण्याचं काम सुरू केलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अजित पवारांना धक्का बसणार? पार्थ पवार पराभवाच्या छायेत Description: पवार कुटुंबियांना पहिला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीय. मावळ लोकसभा मतदासंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार चांगलेच पिछाडीवर आहेत. तब्बल दीड लाख मतांनी पार्थ पवार पिछाडीवर आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles