पहिल्याच निवडणुकीत 'हे' स्टार चेहरे चमकले, तर काहींना निराशा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 12:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभरात घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे हा पक्ष देशात पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी सज्ज झाला आहे.

urmila, gautam and sunny
उर्मिला मातोंडकर, गौतम गंभीर आणि सनी देओल 

मुंबई: लोकसभा निवडणुकीत यंदाच्या वर्षी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. काहींना यात विजय मिळाला तर काहींना पराभवाचा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत बॉलिवूड अभिनेता सनी देओल, माजी क्रिकेटर गौतम गंभीर, मराठी अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. या निवडणुकीत अभिनेता सनी देओळ, डॉ.अमोल कोल्हे, गौतम गंभीर यांना जनतेने आर्शीर्वाद देत निवडून दिले. तर उर्मिला मातोंडकर यांना पहिल्याच निवडणुकीत मोठा धक्का बसला. उर्मिला यांनीही मोठ्या मनाने हा पराभव स्वीकारला. 

  1. सनी देओल: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने पंजाबच्या गुरदासपूर येथून भाजप पक्षाकडून निवडणूक लढवली होती. सनी देओल पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होता. या ढाई किलो का हात असलेल्या अभिनेत्याने पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली आणि निवडणुकीची लढाई जिंकली. त्याने काँग्रेसच्या सुनील झाकर यांचा पराभव केला. सनी देओलला एकूण ५५८७१९ मते मिळाली. तर त्याचे प्रतिस्पर्धी झाकर यांना ४७६२६० मते मिळाली. 
  2. डॉ. अमोल कोल्हे- शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले मराठीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून विजय मिळाला आहे. त्यांच्या अभिनयातील प्रसिद्धीचा या निवडणुकीत पुरेपूर फायदा झाला. त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी अढळराव यांचा पराभव केला. कोल्हे यांना या निवडणुकीत ६३५८३० मते मिळाली. तर सेनेच्या अढळराव यांना ५७७३४७ मते मिळाली. 
  3. गौतम गंभीर - क्रिकेटच्या मैदानावर धुंवाधार फलंदाजी केल्यानंतर राजकारणात बॅटिंगसाठी गौतम गंभीर सज्ज झाला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गौतम गंभीरला नवी दिल्ली येथून विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते. या ठिकाणाहून गौतम गंभीरने काँग्रेसच्या अरविंदर सिंग लव्हली यांना हरवले. गौतम गंभीरला या निवडणुकीत ६९६१५६  मते मिळाली. तर काँग्रेसच्या लव्हली यांना ३०४९३४ मते मिळाली. 
  4. उर्मिला मातोंडकर - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही यंदाच्या निवडणुकीतून राजकारणात प्रवेश केला. उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली होती. या ठिकाणाहून तिच्याविरोधात भाजपचे अनुभवी खासदार गोपाळ शेट्टी होते. आपल्या पहिल्याच निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या ठिकाणाहून उर्मिलाला २४१४३१ मते मिळाली तर गोपाळ शेट्टींना ७०६६७८ मते मिळाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी