'आता फक्त पक्षाचं अध्यक्ष राहायचं आहे', ममता बॅनर्जींकडून मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 25, 2019 | 20:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव पक्षातील नेत्यांसमोर मांडला आहे. ममता यांना आता फक्त पक्षाच्या अध्यक्ष पदावर राहायचं आहे.

mamata_banerjee_Ani
ममता बॅनर्जींकडून मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव  |  फोटो सौजन्य: ANI

कोलकाता: लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बंगालमध्ये भाजपने तब्बल १८ जागांवर विजय मिळवत टीएमसीचा सुपडा साफ केला आहे. या अपयशामुळे व्यथित झालेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे. आज (शनिवार) ममता बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली पक्षाची तातडीची बैठक पार पडली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत असं म्हटलं की, 'मी बैठकीत म्हटलं आहे की, मी आता मुख्यमंत्री पदावर राहू इच्छित नाही, आता मी फक्त पक्षाची अध्यक्षा म्हणूनच काम करेन.' पण असं असलं तरीही ममता बॅनर्जी यांचा राजीनामा बैठकीत स्वीकाराला गेलेला नाही. 

तृणमूलच्या तातडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'त्यांनी आमच्याविरोधात अनेक कारवाया केल्या. त्यामुळे एका आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. हिंदू-मुस्लीम यांच्यात भेदभाव करण्यात आला. सोबतच मतांची फेरबदलही करण्यात आली. आम्ही याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली. पण त्याविरोधात कोणतंही ठोस पाऊल उचलण्यात आलं आहे.' 

ममता बॅनर्जी पुढे असंही म्हणाल्या की, 'मी मागील ५ महिन्यांपासून काम करू शकलेली नाही. पाच महिन्यांपासून निवडणूक आयोगाच्या अंतर्गत सारं काही असल्याचं म्हटलं जात आहे. अशाप्रकारची निवडणूक याआधी कधीही इथे झालेली नव्हती. पण प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे मी भाजपला त्यांना मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा देते. निवडणूक आयोगाने पूर्णपणे भाजपला समर्पित होऊन काम केलं. मग कुणी काहीही म्हणो. त्यामुळे या निवडणुकीचं मॅन ऑफ द मॅच हे निवडणूक आयोगच आहे.' अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. 

ममता बनर्जी यांनी पार्थ चटर्जी, अभिषेक बनर्जी, अमित मित्रा, दिनेश त्रिवेदी, सुदीप बंदोपाध्याय, फिरहाद हकीम, अरुप बिस्वास आणि सुब्रत बक्क्षी यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ममता यांनी भाजपवर बरीच टीका केली. 'भाजपने संपूर्ण राज्यातील सिस्टम हॅक केली होती. त्यांनी इथं आपत्कालीन परिस्थिती निर्माण केली. त्यांनी प. बंगालमध्ये २३ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेऊन देखील त्यांना २३ जागा जिंकता आल्या नाही.' असं ममता यावेळी म्हणाल्या. 

'मतांची विभागणी करण्यात ते यशस्वी झाले. ते हिंदू विरुद्ध मुस्लीम या आपल्या अजेंड्यात यशस्वी ठरले. पण मी कधीही त्यांच्यासारखी होऊ शकत नाही. मी आजही विचार करत आहे की, त्यांना निवडणुकीत ज्या पद्धतीने पैसा ओतला तो कल्पनेबाहेरचा होता. मी काँग्रेसप्रमाणे देखील नाही. कारण ते कधी शरण जातात तर कधी तटस्थ राहतात.' असंही यावेळी ममता म्हणाल्या. 

ममता पुढे असंही म्हणाल्या की, 'मी ऐकलं आहे की, शपथविधी सोहळ्याला ते पाकिस्तानला निमंत्रण देणार आहेत. मग आपण निवडणुकीदरम्यान पाकिस्तानच्या मुद्द्याचा वापर का केल्यात? जर आम्ही काही बोललो तर मग आम्हाला पाकिस्तानी म्हटलं जातं.' असं म्हणत ममतांनी मोदींवर निशाणा साधला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'आता फक्त पक्षाचं अध्यक्ष राहायचं आहे', ममता बॅनर्जींकडून मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव Description: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव पक्षातील नेत्यांसमोर मांडला आहे. ममता यांना आता फक्त पक्षाच्या अध्यक्ष पदावर राहायचं आहे.
Loading...
Loading...
Loading...