काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी केलं 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचं कौतुक, मोदींनी म्हटलं...

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 24, 2019 | 08:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Milind Deora praises Modi: महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मिलिंद देवरा यांनी मोदींचं कौतुक करताच त्यांना मोदींनीही उत्तर दिलं आहे.

milind deora praises narendra modi howdy modi event india america congress bjp assembly election 2019
मिलिंद देवरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो) 

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केलं मोदींचं कौतुक
  • मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय
  • मिलिंद देवरा यांनी मोदींचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा

मुंबई: राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणालाही वर्तवता येणार नाही. वेळ आणि परिस्थितीनुसार राजकारणातील समिकरणं सुद्धा बदलत असतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे आणि राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मिलिंद देवरा यांनी मोदींचं कौतुक केल्याने सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींचा नुकताच 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. तसेच ५० हजारांहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर मिलिंद देवरा यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करत म्हटलं, ह्यूस्टन येथे मोदींनी ज्याप्रमाणे आपलं म्हणणं मांडले ते खूपच महत्वाचं आहे, भारताच्या सॉफ्ट पावर डिप्लोमसीसाठी हे महत्वाचं आहे. माझे वडील मुरली देवरा हे सुद्धा भारत आणि अमेरिका यांच्यातील सखोल संबंधासाठी आग्रही होते. भारताच्या विकासात अमेरिकेचे योगदानही महत्वाचे आहे. 

मिलिंद देवरा यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधान मोदींनीही उत्तर दिलं आहे. मोदींनी ट्विट करत म्हटलं, तुम्ही अगदी बरोबर म्हटलं आहे. माझे मित्र दिवंगत मुरली देवराजी हे अमेरिकेसोबतच्या दृढ संबंधाचे समर्थक होते. निश्चितच भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ होताना पाहून त्यांना आनंदच झाला असता.

मोदींनी केलेल्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा मिलिंद देवरा यांनी ट्विट करत मोदोंचे आभार मानले आहेत.

यापूर्वीही मिलिंद देवरांनी केलंय मोदींचं कौतुक

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी यापूर्वी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते भाजपत प्रवेश करत आहेत आणि त्यातच मिलिंद देवरा यांनी मोदींचं कोतुक केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी