अंबानी कुटुंबियांचा काँग्रेसला नाही तर मोदींनाच पाठींबा?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 26, 2019 | 22:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

महायुतीची सभा मुंबईतील बीकेसी मैदानात पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच महायुतीचे राज्यातील सर्वच नेते उपस्थित होते. मात्र, या सभेची खास बाब म्हणजे अंबानी कुटुंबियांतील सदस्याची उपस्थिती.

Narendra Modi rally in BKC
नरेंद्र मोदींची मुंबईत जाहीर सभा  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: मुंबईतील बीकेसी येथे महायुतीची विजय संकल्प सभा नुकतीच पार पडली. ही सभा सुरू होण्यापूर्वी टीव्ही चॅनल्सचे कॅमेरे, वर्तमानपत्राचे फोटोग्राफर्स या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या उपस्थितीने. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या सभेत चक्क अनंत अंबानी दिसला आणि सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला. कारण, काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी यांचे वडील आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा दिला होता. त्यानंतर अनंत अंबानी हे मोदींच्या सभेत दिसले त्यामुळे अंबानी कुटुंबियांचा पाठींबा नेमका कुणाला हा प्रश्न आता उभा राहीला आला आहे.

मोदींना पाठींबा देण्यासाठी उपस्थित

मुंबईतील सभेत उपस्थित असलेल्या अनंत अंबानी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी सर्वच प्रसारमाध्यमांनी त्यांना घोळका घातला होता. यावेळी एबीपी माझा वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना अनंत अंबानी यांनी म्हटले की,  मी देशाला सपोर्ट करण्यासाठी येथे आलो आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना ऐकण्यासाठी आलो आहे.

काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर आता अनंत अंबानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत उपस्थित असल्याचं दिसून आलं. एकिकडे राहुल गांधी आपल्या जाहीर सभांमध्ये अनिल अंबानी यांना राफेल डील वरुन टार्गेट करत असल्याचं दिसत आहेत. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी थेट काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठींबा देत त्यांचं समर्थन केलं होतं. 

वडिल मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा दिला असताना अनंत अंबानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत दिसून आले. मुंबई २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंबीय नेमकं कुणाला मतदान करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी