राष्ट्रवादीला मोठं खिंडार, 'या' दिग्गज पिता-पुत्रांचा भाजपत प्रवेश

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 11, 2019 | 23:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ganesh Naik join BJP: महाराष्ट्रात राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी भाजपत प्रवेश केला आहे. संजीव नाईक यांनीही भाजपत प्रवेश केला आहे

Ganesh Naik join BJP
गणेश नाईक यांचा भाजपत प्रवेश  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा भाजपकडून मोठा झटका
  • संजीव नाईक यांचाही भाजपत प्रवेश
  • गणेश नाईक यांच्यासोबत ४८ नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात इतर पक्षातील नेत्यांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपने यापूर्वी आपल्या पक्षात दोनवेळा मेगाभरती करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर आता भाजपची तिसरी मेगाभरती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांनी भाजपत प्रवेश केला आहे. सोबतच माजी खासदार संजीव नाईक यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक भाजपत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या अखेर आज गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला आहे.

नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजपचं कमळ आपल्या हाती घेतलं आहे. यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेतील ४८ नगरसेवकांनीही भाजपत प्रवेश केला आहे. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.

गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक दिग्गज नेते होते. आघाडी सरकारच्या काळात त्याच्याकडे मंत्रिपदही होतं. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने गणेश नाईक, संजीव नाईक यांना पक्षात प्रवेश देत नवी मुंबईत आपली बाजू आणखीन भक्कम केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपत प्रवेश

तर दुपारी मुंबईत काँग्रेसचे इंदापूरमधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना आगामी विधानसभेची उमेदवारी देण्याचंही जाहीर केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...