राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागरांनी बांधले ‘शिवबंधन’

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 22, 2019 | 18:34 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील, अशी शक्यता वाटत होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

jaydatta kshirsagar joining shivsena
जयदत्त क्षीरसागर शिवबंधनात   |  फोटो सौजन्य: ANI

बीड : गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात ज्या राजकीय निर्णयाची चर्चा सुरू होती. तो निर्णय आता झाला आहे. बीडमधील राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या या राजकीय निर्णयाची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते हा निर्णय घेतील, अशी शक्यता वाटत होती. पण, त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय केव्हाच घेतला होता. फक्त कोणत्या पक्षात प्रवेश करायचा आणि कधी करायचा याची घोषणा बाकी होती. आता त्यांचा शिवसेनेत प्रवेश  झाला असून, त्याची घोषणाही करण्यात आली आहे. तत्पूर्वी, आमदार क्षीरसागर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर महाराष्ट्रातील बरीच राजकीय गणितं अवलंबून आहेत. लोकसभेचे मतदान झाल्यानंतर लगेचच राजकीय पक्ष आणि नेते मंडळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहेत. त्यातच एक्झिटपोलमध्ये केंद्रात भाजप प्रणीत एनडीएचे सरकार येणार हे स्पष्ट झाल्यामुळे आतापासूनच नेते मंडळी पुढचे राजकीय निर्णय घेऊ लागली आहेत. त्यात बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर आघाडीवर आहेत, असे म्हणावे लागेल. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेतप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे.

 

 

पक्षात खूप घुसमट होत होती. ती कधीपर्यंत सहन करायची. स्वाभिमानाचा ठेच पोहोचल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, क्षीरसागर कुटुंबाचे शिवसेनेत स्वागत आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी सोडण्याचे कारण?

जयदत्त क्षीरसागर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज होते. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत मोठी संधी मिळाल्यानं बीड जिल्ह्यात क्षीरसागर अडचणीत आले होते. जिल्ह्यातील राष्ट्रवादीतच दोन गट तयार झाले होते. राष्ट्रवादीमध्ये नाराजी असतानाही ज्येष्ठ नेते त्याची दखल घेत नसल्याचे क्षीरसागर यांच्या गोटातून सांगण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवणुकीत क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. मोदींचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यावेळी क्षीरसागर यांनी केले होते.

भाजपमध्ये थेट प्रवेश करणार नाही. पण, भाजपलाच मदत करेन, असं क्षीरसागर यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यामुळं क्षीरसागर राष्ट्रवादीतून बाहेर पडणार हे त्याचवेळी निश्चित झाले होते. त्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण, क्षीरसागर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या शिवेसना प्रवेशाची शक्यता वाढली होती. त्यांनी भाजप ऐवजी शिवसेनेची निवड केली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात विधानसभेची समीकरणं बदलणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागरांनी बांधले ‘शिवबंधन’ Description: बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील, अशी शक्यता वाटत होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Loading...
Loading...
Loading...