विधानसभा उपसभापती विजय औटी यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, 'ती' क्लिप जनतेसमोर ठेवणार: निलेश लंके

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 17, 2019 | 10:09 IST | ऊमेर सय्यद

विधानसभा निवडणूक २०१९ आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा कुठल्याहीक्षणी होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आता राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

ncp nilesh lanke targets shiv sena mla vijay auti
विधानसभा उपसभापती विजय औटी यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

थोडं पण कामाचं

  • विधानसभा उपसभापती विजय औटी यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
  • विधानसभा निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू
  • वेळ आल्यास विजय औटी हे कमिशन मागत असल्याची व्हिडिओ क्लिप जनतेसमोर ठेवणार: राष्ट्रवादी

अहमदनगर: विधानसभेचे उपसभापती आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी हे विकासकामांच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा घणाघाती आरोप निलेश लंके यांनी केला आहे. निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार आहेत. विजय औटी हे कमिशन मागत असल्याची व्हिडिओ क्लिप वेळ आल्यावर जनतेसमोर ठेवणार अशी प्रतिक्रियाही निलेश लंके यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती आणि शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचे संकेत देखील राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून उमेदवारीचे संकेत देताच निलेश लंके यांनी विजय औटी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

पारनेर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख आणि विजय औटी यांचे खंदे समर्थक मानले जाणारे निलेश लंके यांच्या विरोधात औटी यांनीच कट कारस्थान करून शिवसेनेतून लंकेची हकालपट्टी केली होती असा आरोप लंके स्वतः करत आहेत. तसेच शिवसेनेला रामराम केल्यानंतर विधानसभेचे उपसभापती औटी यांच्या विरोधात दंड थोपटत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेत  विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे.

दरम्यान विधानसभा उपसभापती यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या लंकेनीं भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात विजय औटी यांच्यावर गंभीर आरोप केला. विजय औटी हे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा आरोप केला असून वेळप्रसंगी त्याची व्हिडिओ क्लिप देखील जनतेसमोर ठेवणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. 

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीच्या या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी