ममता दीदी दरवर्षी माझ्यासाठी १-२ कुर्ते पाठवून देतात: पंतप्रधान मोदी 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 24, 2019 | 12:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान मोदी यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारशी बातचीत करताना विरोधी पक्षातील लोकांशी आपले आजही मैत्रीचे संबंध असल्याचं सांगितलं. याचवेळी मोदींनी ममतादीदीशी असेलेले सलोख्याचे संबंध याबाबतही भाष्य केलं.

pm_modi_with_akshay_ ANI twitter
ममता दीदी माझ्यासाठी दरवर्षी १-२ कुर्ते पाठवून देतात: पंतप्रधान मोदी   |  फोटो सौजन्य: ANI

 

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला एक अतिशय हटके मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मोदींनी आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. याचवेळी मोदींनी हे देखील स्पष्ट केलं की, त्यांचे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांशी आजही चांगले संबंध आहेत. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही सलोख्याचे संबंध असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. 

अक्षय कुमारशी अनौपचारिक गप्पा मारताना पंतप्रधान मोदींनी बऱ्याच गोष्टी अतिशय खुलेपणाने सांगितल्या. याच मुलाखतीत मोदींनी ममता दीदींबाबतही एक मोठी गोष्ट सांगितली. 'ममता दीदी या आजही वर्षातून एक किंवा दोन कुर्ते माझ्यासाठी खरेदी करतात.' आपले विरोधी पक्षातील नेत्यांशी कसे संबंध आहेत? या प्रश्नावर मोदींनी संक्षिप्त उत्तर दिलं. या प्रश्नाबाबत बोलताना मोदी असं म्हणाले की, 'आजही माझे विरोधी पक्षातील अनेकांशी चांगले संबंध आहेत. वैयक्तिक पातळीवर माझी अनेकांशी आजही तितकेच सलोख्याचे संबंध आहेत.' 

याचविषयी बोलताना मोदींनी ममता दीदींबाबत एक किस्सा सांगितला. 'आता जर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर निवडणुकीत माझं नुकसान होऊ शकतो. पण तरी तुम्हाला सांगतो... ममता दीदी या स्वत: माझ्यासाठी कुर्ते सिलेक्ट करायला जातात आणि वर्षातून एक ते दोन वेळा त्या मला कुर्ते पाठवतात. तर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या देखील मला बंगाली मिठाई पाठवतात. एका दौऱ्यावर असताना एकदा आमचा बंगाली मिठाईबाबत विषय झाला होता. तेव्हापासून त्या प्रत्येक वर्षी त्या मला ढाकामधील प्रसिद्ध बंगाली मिठाई पाठवतात. याविषयी जेव्हा ममता दीदींना माहिती पडलं तेव्हापासून त्या देखील वर्षातून एक ते दोन वेळा मला बंगाली मिठाई पाठवतात.'

 

याचवेळी मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याविषयी देखील एक जुना किस्सा सांगितला. 'मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री नव्हतो पण राजकारणा सक्रिय होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. मी एका कामानिमित्त एकदा संसदेत गेलो होतो. जिथे माझी भेट काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी झाली. त्यावेळी माझं त्यांच्याशी बरंच चांगलं बोलणं झालं. त्यानंतर जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो त्यावेळी अनेक मीडियाच्या लोकांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारले की, मोदी आरएसएसचे असताना देखील त्यांच्याशी तुमचे एवढे चांगले संबंध कसे काय? यावर नबी यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं. ते असं म्हणाले की, सर्व पक्षांचे लोकं हे कुटुंब म्हणून जोडले गेले आहेत. ज्याची कल्पना ही बाहेर लोकांना देखील नसते.' 

दरम्यान, ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षातील नेत्यांशी असेलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचं हे वक्तव्य सध्या फारच महत्त्वाचं ठरू शकतं. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर टीका करण्यात गुंतलेले असताना दुसरीकडे खुद्द पंतप्रधान मोदींनी आपले मैत्रीपूर्ण संबंध उघड केल्याने त्यांच्या वक्तव्याला आता महत्त्वा प्राप्त झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे आमने-सामने आहेत. मागील अनेक जाहीर सभांमधून पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जींनी अनेकदा मोदींवर पलटवार केला आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय वादविवाद सुरू असताना दुसरीकडे मोदींनी आपल्या मैत्रीचे दाखलेही दिले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ममता दीदी दरवर्षी माझ्यासाठी १-२ कुर्ते पाठवून देतात: पंतप्रधान मोदी  Description: पंतप्रधान मोदी यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारशी बातचीत करताना विरोधी पक्षातील लोकांशी आपले आजही मैत्रीचे संबंध असल्याचं सांगितलं. याचवेळी मोदींनी ममतादीदीशी असेलेले सलोख्याचे संबंध याबाबतही भाष्य केलं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola