कोल्हापूर: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या पवार कुटुंबाची काळजी तुम्ही करू नये, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. आमचे कार्यकर्ते पक्षाची काळजी घेण्यास समर्थ आहेत, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. वर्धा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर घरणेशाहीचा आरोप केला होता. त्याला पवार यांनी कोल्हापुरातील राष्ट्रावादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रत्युत्तर दिले.पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमचा पक्ष कोणा एका व्यक्तीचा नाही. पक्षाचे कार्यकर्तेच काळजी घेण्यास समर्थ आहेत. त्यामुळे मोदींनी आमच्या पक्षाची आणि कुटुंबाची काळजी घेऊ नये.’ माझ्या आईची जडणघडण पंचगंगेच्या पाण्यावर झाली आहे. तिचे संस्कार माझ्यावर आहेत, असे भावनिक वक्तव्यही पवार यांनी केले.
पंतप्रधान मोदी आणि भाजप सातत्याने गांधी कुटुंबावर टिका करतात. त्यालाही पवार यांनी कोल्हापुरातून उत्तर दिले. पवार म्हणाले, ‘गांधी घराण्यावर आकसाने टिका केली जात आहे. मुळात देशाच्या जडणघडणीत गांधी घराण्याचे मोठे योगदान आहे. पण, गांधी कुटुंबावर अशी टिका करणाऱ्यांकडून फारशी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही.’
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, ‘पवार कुटुंबाची काळजी करण्यापेक्षा पंतप्रधान मोदींनी आत्मपरिक्षण करावे.’ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, असेही अजित पवार म्हणाले. देशातील तरुणांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. गेल्या काही वर्षांत जागतिक बजारपेठेत मंदी आहे. पण, भारतासारखी अर्थव्यवस्था तग धरून आहे. त्याला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे धोरण कारणीभूत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी सुरुवातीला माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. त्यावेळी पवार कुटुंबातून दोघांनाच उमेदवारी असेल, अशी चर्चा होती. पण, नाट्यमय घडामोडींनंतर पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्याचवेळी पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. पण, पार्थ यांच्या उमेदवारीविषयी सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पार्थ यांच्यामुळे पवार कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथील सभेत पवार यांना या मुद्द्यावरून लक्ष्य केले होते. त्याला शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामती येथेही सभा होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुन्हा बारामतीमध्ये काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.