राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ लोकसभेत फेल!

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 16:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उतरवला नाही. मात्र त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेत मोदी-शहा जोडीवर सडकून टीका केली. मात्र सभा फेल झाल्यात.

Raj Thackeray
राज ठाकरेंच्या सभा लोकसभेत फेल 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’नं राज्य दणाणून सोडलं होतं. लोकसभा निवडणूक २०१९ प्रचारात राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरेंनी राज्यात तब्बल १० सभा घेतल्या. राज ठाकरेंच्या या जाहीर सभांची संपूर्ण राज्यात एकच चर्चा होती. तसंच राज ठाकरेंच्या सभा आपल्या परिसरात व्हावी, याची ही मागणी वाढत होती. आपल्या सभांमधून राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र राज ठाकरेंच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होतांना दिसत नाहीय. राज ठाकरेंनी जिथं-जिथं सभा घेतल्या, तिथले आघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. फक्त सातारा आणि बारामती इथले उमेदवार आघाडीवर दिसतायेत.

याबाबत भाजपच्या गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंच्या सभांचा भाजप-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं म्हटलंय. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या सभेमुळे भाजप-शिवसेनेचं मताधिक्य कमी झाल्याचं म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीमुळेच भाजपला फायदा झाल्याचं मत देशपांडेंनी व्यक्त केलंय.

२०१४ मधील मनसेची स्थिती

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेनं आपले उमेदवार उभे केले होते. मुंबईतून तीन उमेदवार दक्षिण मुंबईतून- बाळा नांदगावकर, उत्तर-पश्चिम मुंबईतून अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून आदित्य शिरोडकर मैदानात उतरले होते. मात्र राज ठाकरेंच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. याशिवाय राज ठाकरेंनी २०१४ मध्ये कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, भिवंडी आणि ठाणे मतदारसंघातूनही आपले उमेदवार उभे केले होते. सर्वच जागांवर मनसे उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यांचं व्होट शेअर चांगलं होतं.

त्यामुळं आता यंदा जरी राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असले, तरी त्या उमेदवारांचं व्होट शेअर बघणं महत्त्वाचं ठरेल.

'लाव रे तो व्हिडिओ' ची विधानसभा निवडणुकीतही होणार चर्चा?

एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसताना राज ठाकरेंनी लोकसभेच्या प्रचारासाठी सभा घेतल्या आणि या सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली. राज ठाकरेंनी या जाहीर सभांमधून 'लाव रे व्हिडिओ' म्हणत विविध व्हिडिओ दाखवले. मोदींच्या जुन्या भाषणाच्या क्लिप्स, मुलाखतीमधील काही क्लिप्स, वृत्तपत्रातील बातम्या, फोटोज दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकारच्या योजनांवर हल्ला चढवला. याच 'लाव रे व्हिडिओ' ची संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियात जोरदार चर्चा पहायला मिळाली. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचा पुन्हा एकदा नव्यानं ‘लाव रे तो व्हिडिओ’ पाहायला मिळू शकतो. लोकसभेत नाही पण विधानसभेत मनसेला काय फायदा होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ लोकसभेत फेल! Description: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उतरवला नाही. मात्र त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेत मोदी-शहा जोडीवर सडकून टीका केली. मात्र सभा फेल झाल्यात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles