राज ठाकरेंच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम जाहीर

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 16:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

पहिल्या टप्प्यातील सभा घेतल्यानंतर आता राज ठाकरेंच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या टप्प्यात राज ठाकरे चार ठिकाणी सभा घेणार आहेत.

raj thackeray
राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभरात भाजपविरोधात निवडणुकीचा प्रचार करत आहेत. राज्यातील विविध मतदारसंघात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. पहिल्या टप्प्यातील सभा घेतल्यानंतर आता राज ठाकरेंच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या टप्प्यात राज ठाकरे चार ठिकाणी सभा घेणार आहेत. मनसेच्या अधिकृत पेजवरून राज ठाकरेंच्या दौऱ्याचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरे दोन सभा मुंबईत घेणार आहेत तर दोन सभा पनवेल आणि नाशिक येथे घेणार आहे. 

राज ठाकरेंचे दुसऱ्या टप्प्यातील पहिले भाषण मुंबईच्या अभ्युदयनगर-काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर होणार आहे. त्यांची दुसरी सभा बुधवारी भांडुपच्या जंगल मंगल रोडवर होणार आहे. तिसरी सभा कामोठे गणेश मैदान, खांदेश्वर स्टेशनजवळ होणार आहे. शुक्रवारी चौथी सभा नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. या चारही सभांची वेळ संध्याकाळी साडेपाच वाजताची असणार आहे. 

कुठे आणि कधी होणार सभा 

  1. मंगळवार २३ एप्रिल २०१९ - मुंबई, काळाचौकी
  2. बुधवार २४ एप्रिल २०१९ - मुंबई भांडुप(पश्चिम)
  3. गुरूवार २५ एप्रिल २०१९ - पनवेल
  4. शुक्रवार २६ एप्रिल २०१९ - नाशिक

यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही आहे. मात्र त्यानंतरही राज ठाकरे सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मोदींच्या आधीच्या भाषणाचे व्हिडिओ लाव रे व्हिडिओ असे म्हणत ते अनेक योजनांची पोलखोल करत आहेत. याआधीही राज्यात झालेल्या अनेक सभांमध्ये मोदींच्या योजना आणि त्यांनी त्या कशा पूर्ण केल्या नाहीत याची पोलखोल केला होती. आगामी प्रचारसभांमध्येही राज ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालणार आहेत याचीच उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. 

विरोधकांना फायदा

यंदाच्या निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार नसला तरी भाजपविरोधात प्रचाराचे त्यांनी रान उठवले आहे. त्यामुळे आपसूकच याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होत आहे. राज ठाकरे यांनी प्रत्यक्षपणे हे जाहीर केले नसले तरी त्यांच्या भाजपविरोधी धोरणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यात काही मते पडतील हे निश्चित.  

लाव रे तो व्हिडिओ

या प्रचारादरम्यान ते मतदारांना भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करत आहेत. मोदी आणि शहा हे राजकीय पटलावर दिसता कामा नयेत यासाठी भाजपला मतदान करू नका असे राज ठाकरे आपल्या भाषणातून सांगत आहे. आपल्या भाषणात ते ऑडिओ व्हिज्युअल प्रझेंटेशनवर भर देत आहेत. दरम्यान त्यांच्या प्रचारसभेत वारंवार बोललण्या जाणाऱ्या  'लाव रे तो व्हिडिओ' या वाक्याने विरोधकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. लाव रे तो व्हिडिओ या वाक्यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्सही पाहायला मिळाले. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज ठाकरेंच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम जाहीर Description: पहिल्या टप्प्यातील सभा घेतल्यानंतर आता राज ठाकरेंच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या टप्प्यात राज ठाकरे चार ठिकाणी सभा घेणार आहेत.
Loading...
Loading...
Loading...