Riteish Deshmukh: 'देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही, एक हृदय लागतं...', रितेश देशमुखची सभेत फटकेबाजी 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 16, 2019 | 12:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Riteish Deshmukh: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या लातूरमध्ये काँग्रेसचा जोरदार प्रचार करत आहे. याच प्रचारादरम्यान रितेशने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

riteish deshmukh_twitter
'देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही, एक हृदय लागतं...'  |  फोटो सौजन्य: Twitter

लातूर: 'देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही, एक हृदय लागतं... चांगलं मन लागतं. ५६ इंचाची छाती म्हणजे केवढी असेल.. ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं.' अशा शब्दात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने लातूरमधील सभेत फटेकबाजी केली. लातूरमधील काँग्रेसच्या एका जाहीर सभेत रितेश बोलत होता. त्यावेळी त्याने आपल्या खुमसदार शैलीत भाजपचा समाचार घेतला. यावेळी त्याने भाजपवर बरीच टीका देखील केली. 'देशाला स्वातंत्र्य मिळालं ते काँग्रेसमुळे हे विसरू नका.' असंही यावेळी रितेशने आवर्जून सांगितलं.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीमुळे प्रचार टीपेला पोहचला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेसने देखील या निवडणुकीसाठी संपूर्ण जोर लावल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यात देखील काँग्रेसने अनेक स्टार प्रचारक उतरवले आहेत. त्यामुळेच रितेश देशमुख यांनी लातूरमध्ये सभा घेऊन भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.  

नेमके काय म्हणाला रितेश देशमुख? 

'आता वापरतायेत फोनवरुन ट्विटर, फेसबुक... अहो तुमच्या खिशात जो फोन आहे ना.. तो काँग्रेसने दिलेला फोन आहे. लातूरमध्ये जी मोबाइल सेवा आलीए ना ती साहेबांनी आणलेली आहे. तुम्ही आज जे कम्प्युटर वापरतायत ते काँग्रेसने दिलंए. तरीही तुम्ही विचारता की काँग्रेसने काय दिलं? मोठा गर्व आहे त्यांना की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे ते पहिले पंतप्रधान आहेत. अहो पण भारताला जे स्वातंत्र्य मिळालंय ती देखील काँग्रेसचीच देन आहे. एवढं लक्षात ठेवा. ते म्हणतात देशासाठी त्यांची ५६ इंचांची छाती आहे. मला प्रियंका गांधींचं एक वाक्य आठवतं. देश चालवायला ५६ इंचांची छाती लागत नाही. तर एक हृदय लागतं... चांगलं मन लागतं. मी पण विचार करत होतो की, ५६ इंचाची छाती म्हणजे किती मोठी छाती असेल. अहो ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं. हवं तर तुम्ही घरी जाऊन टेपने मोजून पाहा.' अशी टोलेबाजी रितेश देशमुखने यावेळी केली. 
 


सध्या रितेश देशमुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियात देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.  

दरम्यान, लातूर मतदारसंघातून काँग्रेसने मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यांच्याच प्रचार सभेत रितेश बोलत होता. दुसरीकडे भाजपने सुधाकर भालेराव यांना उमेदवारी देऊ केली आहे. लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघ हा २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण २०१४ मध्ये भाजपचे डॉ. सुनील गायकवाड हे लोकसभेवर निवडून गेले होते. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांचं तिकीट कापलं असून त्याऐवजी सुधाकर भालेराव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता लातूरमध्ये नक्की कोण बाजी मारणार याकडेच लातूरवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी