Exclusive : देशात पुन्हा NDA चे सरकार स्थापन होणार, एका पक्षाचे नाही : संजय राऊत 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 20:06 IST | अकृता रेयार

एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने सांगितले आहे की यंदा पुन्हा NDA चे सरकार केंद्रात स्थापन होणार आहे. सध्या तरी मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. 

sanjay raut
खासदार संजय राऊत  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल टाइम्स नाऊ न्यूज डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत आपले रोखठोक मत मांडले. टाइम्स नेटवर्क डिजिटल चीफ एडीटर अकृता रेयार यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी सध्याची महाराष्ट्रातील स्थिती, युती, नरेंद्र मोदी, शिवसेनेची भूमिका, साध्वी प्रज्ञा सिंह, वंचित बहुजन आघाडी यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.  यावेळी राऊत यांनी २३ मे रोजीनंतर एनडीएचा पंतप्रधान होणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. सध्या एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. पण निवडणुका झाल्यावर आम्ही सर्व घटक पक्ष बसू आणि नंतर ठरवू. पण सध्यातरी नरेंद्र मोदी यांनी असे काही वाईट काम केले नाही की त्यांना बदलावे लागेल. त्यामुळे तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे त्यांनी ठाम पणे सांगितले.  


संजय राऊत यांनी सविस्तर मुलाखत 

अकृता रेयार (टाइम्स नेटवर्क डिजिटल चीफ एडीटर ): सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीची स्थिती कशी आहे. काय वातावरण आहे.... 

 1. संजय राऊत : महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर २०१४ मध्ये आम्ही निवडणुका सहजपणे जिंकल्या होत्या. ज्या प्रकारचे वातावरण त्यात महाराष्ट्राच्या जनतेने आम्हांला साथ दिली. मोदींची जी लाट आली होती, त्यावर आम्ही पण सवार झालो होतो. पण पाच वर्षात मोदींनी देशावर राज्य केले आहे. आता लोक मोदींचे प्रोग्रेस कार्ड पाहत आहेत. त्यामुळे आता मोदींचे नाव मोठे आहे, त्यांच्यासमोर कोणी नाही हे खरं आहे. काँग्रेसमध्ये नाही, यूपीएमध्ये नाही किंवा महागठबंधनमध्येही नाही. निवडणुका या मोदींच्याच नावावर लढविल्या जाणार आहेत. पण २०१४ च्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत फरक जरूर पडला आहे, हे मान्य करावे लागले. आणि तेच मान्य करून आम्ही निवडणुकांना समोरे जात आहोत.  महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर युतीची कामगिरी ही चांगली असेल असे आमचे मानणे आहे. 


अकृता रेयार :  उद्धव ठाकरेंनी चौकीदार चोर है म्हटले होते, त्यानंतर दोघांमध्ये खूप तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थिती युती होणार की नाही वाटत नव्हते. पण एक अंतर्गत सर्वे झाला त्यात दोघे एकत्र आले नाही तर महाराष्ट्रात अवघड परिस्थिती होईल, असे यात स्पष्ट झाले होते. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आलेत? 

 1. संजय राऊत :  दोन्ही पक्ष एकत्र येणे दोघांच्या फायद्याचे होते. आम्ही जर एकत्र आलो नसतो, त्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की आम्ही आता सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, ही घोषणा २०१७ मध्येच केली होती.  विधानसभेबाबत बोलायचे तर त्यावेळी युती आम्ही तोडली नव्हती, त्यांनीच तोडली होती. त्यानंतर सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढल्या होत्या. त्यानंतर आम्ही तयारीही केली होती की लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवू...  पण त्यानंतर सर्वे आला, आम्ही लोकांशी बोललो पण आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  दुसऱीकडे भाजपला माहिती होते की २०१४ ची स्थिती राहणार नाही. त्यामुळे एनडीतील घटक पक्षासोबतच आपल्या निवडणुका लढवाव्या लागतील हे त्यांनाही लक्षात आले होते.
 2. त्यानंतर एनडीएला मजबूत करण्याचा विचार त्यात आला. जे आम्ही वेळोवळी सांगत आलो आहोत, की काँग्रेस विरोधी नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी आणि मोदी आहेत. पण एकट्या पक्षाच्या जीवावर बहुमत खेचून आणणे शक्य नाही. तो काळही आता राहिला नाही. एनडीए काँग्रेस विरोधी आहे. त्यांनी कायम ती भूमिका ठामपणे मांडली.  पण २०१४ मध्ये पहिल्यांदा एखाद्या पक्षाला केंद्रात एका पक्षाला बहुमत मिळाले. त्यामुळे त्यांना वाटले की आपला पक्ष संपूर्ण देशात शंभर टक्के यश मिळवले. पण असे होत नाही. पुढे होणार नाही. त्यामुळे २०१९ पूर्वी भाजपला अनेक झटके लागले. पोट निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  
 3. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पण त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं.  महाराष्ट्रात दोन पोट निवडणुका झाल्या, त्यात विदर्भातील जागा भाजपनं गमावली आणि पालघरची जागा खूप कमी मताधिक्याने ते विजयी झाले. त्यानंतर हा विचार समोर आला की आपण एकत्र आलो नाही तर २०१९ ला अपेक्षित यश मिळणार नाही. याचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो. ज्या काँग्रेस विरोधात भाजप आणि शिवसेना इतक्या वर्षांपासून लढत आहे. त्यानंतर एकत्र येण्याचे ठरले.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात राहिले. त्यांची चर्चा झाली आणि आम्ही पण विचार केला एका चान्स आपण पण घेऊ.... 


अकृता रेयार : उद्धव ठाकरे यांनी अटल बिहार वाजपेयी आणि मोदी यांची तुलना केली होती.  मित्र पक्षाबाबत अटल बिहारी वाजपेयी एकत्र घेऊन जात होते, पण मोदी नाही.. 

 1. संजय राऊत :  मित्र पक्षांचा सन्मान अटल बिहारी वाजपेयी नेहमी करत होते. सन्मानचा अर्थ असा नाही की मंत्रीपद हवे, किंवा एखादी पोस्ट पाहिजे किंवा फायदा हवा. येवढ्या पुरती सिमित नाही आहे. इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. सन्मान जर तुम्हांला नाही मिळाला तर तुम्ही पाहत असाल एनडीएतील अनेक घटक पक्ष आम्हांला सोडून गेले. आम्हीही बराच काळ निराश आणि नाराज होतो. त्याचा परिणाम जो मोठा पक्ष असतो, जो नेतृत्त्व करतो. त्यांना भोगावा लागतो.
 2. एनडीएला जीवित ठेवण्याचे श्रेय कोणाला जाते तर ते शिवसेना आणि अकाली दलाला जाते. आम्ही कायम या युतीच्या धर्माचे पालन केले आहे. आम्ही कायम सांगत आलो, एनडीए म्हणजे एक पक्ष नाही आहे, फक्त भाजप म्हणजे एनडीए नाही, तर सर्व पक्ष मिळून जी शक्ती आहे ते एनडीए आहे.  एनडीए यासाठी बनवले होते की, या देशात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे. त्यांना संपवायचे नाही आहे. आम्ही काँग्रेसला संपविण्याची गोष्ट कधीच केली नाही. आम्हांला सत्तेवर यायचे आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळे, या पुढेही मला असे वाटते की २०१९ मध्ये एनडीएचेच सरकार स्थापन होणार, कोणत्याही एका पक्षाची सरकार स्थापन होणार नाही. 


अकृता रेयार :  महाराष्ट्रात कायम शिवसेना ही भाजपपेक्षा शक्तीशाली पक्ष राहिला आहे. पण त्याला २०१४ नंतरचा अपवाद आहे.  त्यामुळे आता त्यांनी तुमची जागा घेतली आहे का? 

 1. संजय राऊत :  नाही, जेव्हा कोणाच्या हातात सत्ता येते. तेव्हा त्यांची स्थिती चांगली होते. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आता भाजप म्हणून या... महाराष्ट्र असो वा मध्यप्रदेश... ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्याकडे जास्त साधन सामुग्री असते. खास करून गृहमंत्रालय... आजकाल देशाची सत्ता ही गृहमंत्रालय चालवतो.
 2. भाजपकडे सत्ता आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आयारामांचा ओघ कायम आहे. शिवसेनेतून कोणी भाजपमध्ये गेले नाही. भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज गेले आहेत. जर आमचा मुख्यमंत्री असता तर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आमच्याकडे आले असते. हे आपल्या देशाचे राजकारण आहे. आमचा मुख्यमंत्री असता तर आम्हीही त्याच पोझिशनमध्ये असते.  १९९५ मध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी त्यावेळी आम्ही हे पाहिले आहेत. अपक्ष असो काँग्रेस असो सर्व पक्षांचे आमदार शिवसेनेत दाखल होण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांची रांगच लागली होती. ही सत्ताची ताकद आहे. 


अकृता रेयार : सध्या महाराष्ट्रात शिवसेनेची स्थिती काय आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.

 1. संजय राऊत :  काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसची स्थिती खूप नाजूक आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात नेतृत्व राहिलं नाही आहे. बऱ्याच वर्षांपर्यंत महाराष्ट्र काँग्रेससाठी बालेकिल्ला होता. आजपण काँग्रेस गावागावत आहे. काँग्रेस मुक्त असे काही नसतं. काही लोकांनी शिवसेना मुक्त महाराष्ट्र करण्याच्या बाता केल्या होत्या. पण असे होत नाही. एका राजकीय पक्षाची विचारधारा कायम राहत असते.
 2. २ खासदार असलेले भाजप, असे वाटत होते की संपून जाईल. पण आज भाजप सत्तेत आहे. शिवसेना एक आंदोलनाचा पक्ष आहे. काँग्रेसही महाराष्ट्रात आहे, राष्ट्रवादीचाही गावोगावी संपर्क आहे. आता भाजप वाढत आहे. लोकसभेच्या निवडणुका सांगतील पुढे काय होणार आहे. 


अकृता रेयार :  प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडी काढली. काय वाटते तो मत खाण्याचे काम करतील? मराठवाड्यात याचा अधिक परिणाम जाणवेल का? 

 1. संजय राऊत :  प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांची जी आघाडी आहे, ती महाराष्ट्राबाहेर का चालली नाही. ओवैसी इतके मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, तर महाराष्ट्राबाहेर त्यांची जादू का चालली नाही. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांना मते मिळतात कारण बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे आहेत.
 2. उत्तर प्रदेशात मायावती आंबेडकरांच्या नावावर सत्ता स्थापन करते, पण असे प्रकाश आंबेडकर या ठिकाणी करू शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिले की रिपब्लिकन पार्टी काँग्रेससोबत मत कापण्याचे काम करत आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी याच्या आघाडीला आता काही प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे.  पण मी दाव्याने सांगतो की, मुस्लिमांचे मत प्रकाश आंबेडकरांना मिळत नाही. त्यांना फक्त दलित मतांचा पाठिंबा मिळेल. विशेषतः कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर. मुस्लिम मतदार आजही काँग्रेस सोबत जाईल. 


अकृता रेयार :  शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत साध्वी प्रज्ञा सिंह हिने जे वक्तव्य केले त्या बाबत शिवसेनेची भूमिका काय?  

 1. संजय राऊत :  त्यावेळी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. जेव्हा साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना पकडण्यात आले होते. या वेळी वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या. त्यावेळी आम्ही सांगितले होते की, एटीएएस कोणालाही जाती किंवा धर्माच्या नावाने दहशतवादाशी जोडू शकत नाही. एखाद्या निर्दोष व्यक्तीला फसविण्यासाठी याचा उपयोग करणे चुकीचे आहे. त्यावेळी आम्ही साध्वीला पाठिंबा दिला होता. ती खऱं बोलत असेल की तिला फसविण्यात आले तर त्याची चौकशी झाली पाहिजे.  
 2. पण हेमंत करकरे, अशोक कामठे आणि साळसकर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर ज्या प्रमाणे देशभक्तीचे वातावरण तयार केले होते. तसेच आजही देशभक्तीचे वातावरण आहे. आज आपले जवान पाकिस्तानकडून मारले जात आहेत. त्यांचा अशा वक्तव्याने का सन्मान राहील. ही देशाची भावना आहे, कोणत्या व्यक्तीची भावना असू शकत नाही. पोलीस ऑफिसर असो किंवा देशाचा जवान तो कायम देशासाठी आपले आयुष्य वेचत असतो. उद्धव ठाकरे साहेबांनीही सांगितले होते की करकरे शहीद आहेत, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. साध्वी प्रज्ञा जर काही बोलली असेल तर त्याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यायला हवे. 

अकृता रेयार:  प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस सोडून शिवसेनेत आल्या. पूर्णपणे विरुद्ध विचारधारा... 

संजय राऊत :  मन परिवर्तन होत असते, आता त्या आल्या आहेत. आम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Exclusive : देशात पुन्हा NDA चे सरकार स्थापन होणार, एका पक्षाचे नाही : संजय राऊत  Description: एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने सांगितले आहे की यंदा पुन्हा NDA चे सरकार केंद्रात स्थापन होणार आहे. सध्या तरी मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. 
Loading...
Loading...
Loading...