Exclusive मुलाखत:  'लाव रे तो व्हिडिओ' वर संजय राऊत यांचे रोखठोक मत

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 20:11 IST | प्रशांत जाधव

राऊत यांनी २३ मे रोजीनंतर एनडीएचा पंतप्रधान होणार, कोणत्याही एका पक्षाचा नाही असे स्पष्ट केले. सध्या एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. पण निवडणुका झाल्यावर आम्ही सर्व घटक पक्ष बसू आणि नंतर ठरवू

sanjay raut
संजय राऊत यांनी टाइम्स नाऊ मराठीला रोखठोक मुलाखत दिली.  |  फोटो सौजन्य: Facebook

 मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल टाइम्स नाऊ मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपले रोखठोक मत मांडले. टाइम्स नाऊ मराठीचे संपादक प्रशांत जाधव यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी सध्याची महाराष्ट्रातील स्थिती, चौकीदार, अफजलखान, युती, नरेंद्र मोदी, शिवसेनेची भूमिका,  राज ठाकरे, महाराष्ट्रातील युतीला मिळाणाऱ्या जागांचा अंदाज यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.  राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' या अनोख्या प्रचार पद्धतीवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.  राज ठाकरेंना उशीराने जाग आली आहे, त्यांचे स्वागत करायला हवे. पण अशा माध्यमातून जनतेला जागे करण्याची गरज नाही.  या देशातील जनता सातत्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी जागीच असते, असे ठाम मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. 

यावेळी राऊत यांनी २३ मे रोजीनंतर एनडीएचा पंतप्रधान होणार, कोणत्याही एका पक्षाचा नाही असे स्पष्ट केले. सध्या एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. पण निवडणुका झाल्यावर आम्ही सर्व घटक पक्ष बसू आणि नंतर ठरवू. पण सध्यातरी नरेंद्र मोदी यांनी असे काही वाईट काम केले नाही की त्यांना बदलावे लागेल. त्यामुळे तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे त्यांनी ठाम पणे सांगितले. 
 
 
 प्रशांत जाधव :   गेली पाच वर्ष टीका केल्यानंतर आता पुन्हा भाजपसोबत युती केली, या युतीबाबत तुम्ही खूश आहात का? 
 

 1.  संजय राऊत :  एकदा संसार करायचा ठरवलं तर वाद करून संसार करण्यापेक्षा खुश राहून संसार करावा. आनंद घ्यावा. आणि काही चांगला निर्माण करता आलं तर ते निर्माण करावं, राजकारणात... समाजकारणात तर ते करावं ही आमची भूमिका आहे.  आता आम्ही सांगितलं आहे की मागचं आम्ही विसरून गेलो आहोत. मागचा कोळसा  उगळत बसायची काही गरज नाही आहे. तुम्ही आम्हांला हे बोललात, तुम्ही हे सांगितलं, ते सांगितलं, ह्यात न पडता आम्ही ठरवलं आहे की मागचं विसरावं.  पाटी पुसून टाकावी आणि नवीन काही चांगल्या गोष्टी त्यावर लिहाव्यात. 

 

 प्रशांत जाधव :   शिवसेनेने शत-प्रतिशत अशी घोषणा दिली होती. पण सध्या ती घोषणा बाजुला ठेवून लोकसभेचा विचार करता ४० :६० आणि विधानसभेचा विचार केला तर ५०:५० असे गुणोत्तर झाले आहे. तर मग स्वबळाच्या नाऱ्याचं काय झालं? 
 

 1. संजय राऊत :  शत-प्रतिशतचा अर्थ असा होत नाही की निवडणुकीसाठी १०० टक्के जागा... शत प्रतिशतचा अर्थ होतो की महाराष्ट्राच्या घराघरात शिवसेना पोहचवावी, ही पक्ष म्हणून भूमिका होती.  २०१४ च्या अगोदर आम्ही शिथील होतो, ज्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जागा शिवसेनेने भाजपला जागा सोडल्या, त्या ठिकाणी शिवसेना आम्ही वाढवली नाही. भाजप लढत असल्याने आम्ही तेथे वाढू शकलो नाही.  
 2. ज्या जागा आमच्या वाट्याला आल्या त्याच ठिकाणी आम्ही काम केले. त्यामुळे २०१४ ला विधानसभा लढताना आम्हांला खूप त्रास झाला. आता जागा वाटप काहीही होऊ द्या, महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात शिवसेना काम करणार आहे. बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा विचार हा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचवू आणि शत-प्रतिशत संघटना बांधणीचा काम आम्ही करणार आहोत, असा अर्थ आम्ही घेतो. 


 

प्रशांत जाधव :  शिवसेनेने भाजपच्या नेत्यांवर अनेक वैयक्तिक हल्ले केले, उद्धव ठाकरेही पंढरपूरच्या सभेत चौकीदार चोर असल्याचे म्हटले होते, तसेच अमित शहा यांना अफजलखानाची उपमा देण्यात आली होती.  आता या चौकीदार आणि अफजलखान सोबत युती करताना शिवसैनिकांना काय वाटते? 

 1. संजय राऊत :  आम्ही आता मागचं काहीच आठवणार नाही. कटूता विसरणार आहोत. झालं गेलं ते विसरणार आहोत. आमच्या भांडणाचा फायदा हा काँग्रेसला होता कामा नये, ज्याच्या विरूद्ध आम्ही सातत्याने लढलो, त्यांनाच आमच्या भांडण्चा लाभ होऊ नये , असे दोघांनी मान्य केले.  विशेषतः अमित शहा असतील, मोदी असतील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. अमित शहा घऱी आले, त्यानंतर दोन्ही पक्षांनी ठरवले आपण एकत्र येऊ या, ही पुन्हा संधी घेऊ या. 

 

प्रशांत जाधव : आता काय वाटते आहे की चौकीदार चोर आहे की थोर आहे? 

 1. संजय राऊत :  उद्धव ठाकरे यांच्याा विधानाचा चुकीचा अर्थ तुम्ही घेतला आहे. उद्धव ठाकरे थेट चौकीदार चोर आहेत असे बोललेले नाहीत.  ते वेगळया अर्थाने बोलले आहेत.  वैयक्तिक स्वरूपाचे हल्ले दोन्ही बाजूंनी झाले आहेत. तेव्हाची राजकीय परिस्थिती तेव्हा तशी निर्माण झाली होती. दोघांना लढायचे होते. एकमेकांविरूद्ध आम्ही लढलो, प्रामाणिकपणे लढलो. 


 

प्रशांत जाधव : गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी काही चांगली कामे केली आहे, काही करायची बाकी आहेत? 

संजय राऊत : नक्कीच, या देशात जो काम करतो, त्याच्या समोरची कामे कधी संपत नाहीत.  मोदीं यांनी काही योजनांना आकार दिला.  त्याला मूर्त स्वरूप येण्यासाठी आणखी पाच वर्ष द्यायला हवीत. अशी शिवसेना पक्ष प्रमुखांची भूमिका आहेत.  एखादा पक्ष ६० वर्ष राज्य करतो, तर आणखी पाच वर्ष मोदींना द्यायला काही हरकत नाही. 
 
 

 प्रशांत जाधव :  मोदी कायम एका योजनेवर कायम राहिले नाहीत, डीजिटल इंडिया असो, मेक इन इंडिया असो, स्वच्छ भारत असो त्यांचा फोकस बदलत गेला? 

 1. संजय राऊत :  प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. त्याच पद्धतीने मोदी यांची काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. ते आपल्या कामाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना प्रत्येकवेळी  ते सभांमधून उत्तर देत आहेत.  या देशात लोकशाही आहेत, लोकांच्या मनात शंका आहेत, तुम्ही विचारत आहेत, पत्रकार विचारताहेत. पण तुम्हांला किती कन्व्हिअन्स करतात, हे त्यांचे यश आहे. 


 

प्रशांत जाधव :  मोदी सरकारला १० पैकी किती मार्क द्याल? 

संजय राऊत :   नाही नाही... असे मार्क आम्ही देत नसतो. जनता त्यांना मार्क देईल. 


 

प्रशांत जाधव  :  मुख्यमंत्री राज ठाकरेंना बारामतीचा पोपट म्हणाताहेत, राज ठाकरेंच्या स्क्रिप्ट पवार लिहून देतात, यावर शिवसेनेची भूमिका काय आहे. 

 1. संजय राऊत : मलाही लोक पूर्वी बारामतीचा पोपट म्हणायचे. शरद पवारांशी माझे चांगले संबंध असल्यामुळे असे बोलले जायचे. आता राज ठाकरेंना बोलत आहेत. कोणी कोणाचा पोपट नसतो. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या अस्तित्वासाठी आपली भूमिका मांडत असतो. ती चूक किंवा बरोबर हे जनता ठरवत असते.  राज ठाकरे यांचा पक्ष निवडणूक रिंगणात नाही आहे. पण ठीक आहेत, ते एक भूमिका घेऊन उभे आहेत, आम्ही त्यांना उत्तर देत आहोत. 


 

प्रशांत जाधव : राज ठाकरे अप्रत्यक्ष शिवसेनेविरुद्धही प्रचार करीत आहेत, भाजपकडून उत्तर येत आहे, पण शिवसेना गप्प आहे. 

 1. संजय राऊत :  राज ठाकरे यांच्या प्रचाराचा रोख विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे आहे. याला भारतीय जनता पक्ष उत्तर देत आहोत, तसेच आम्हीही उत्तर देत आहोत.  उगाच मत प्रदर्शन न करणं आणि किंमत न देणे एखाद्या विषयाला ही सुद्धा एक प्रकारे प्रतिक्रिया असते. मौन ही ताकद आहे. 


 

प्रशांत जाधव :  गेली पाच वर्ष ज्या मुद्यांवरून सरकारला तुम्ही घेरत आले आहात,  ते मुद्दे ते 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून जनतेसमोर जात आहेत? 

 1. संजय राऊत :  त्यांना उशिरा का होई ना जाग आली आहे.  त्यांचे स्वागत आहे.  मला असे वाटते की निर्णय जनतेलाचा घेऊ द्या. जनतेला जागं करण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. खास... या देशातील जनता सातत्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी जागीच असते. तसं नसतं तर या जनतेने अटल बिहारी वाजपेयी यांचा पराभव केला नसता. इंदिरा गांधींचाही पराभव केला नसता आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारचा पराभव करून मोदींना सत्तेवर आणले नसते.  या देशाची सर्व जाती, धर्म आणि प्रांताची जनता जागरूक असते त्यांना जागे करण्याची गरज नसते. 


 

प्रशांत जाधव :  मागे तुम्ही म्हणाला होता, एनडीएचा पंतप्रधान असेल पण नरेंद्र मोदी नसतील, आता काय मत आहे ?  

 1. संजय राऊत :  एनडीएचा पंतप्रधान असेल असे मी आजही म्हणतो, आम्ही निवडणूक झाल्यावर एकत्र बसू ना. आज मोदींचा चेहरा आहे. तसेच आज वाटते की एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदीच आहेत. २०१४ मध्ये लोकांनी तो चेहरा स्वीकारला होता आणि तो चेहरा दूर करावा असे काही भयंकर घडलेले नाही.  २०१९ ला एनडीएचे पंतप्रधान मोदीच असतील. 


 

प्रशांत जाधव :  राज ठाकरेंनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रचार तंत्र आणले आहे. त्या बाबत शिवसेनेला काय वाटते. 

संजय राऊत :  डीजिटल इंडिया, मोदींमुळेच हे शक्य झाले आहे. 


 

प्रशांत जाधव :  यंदा महाराष्ट्रात मोदी लाट आहे.

 1. संजय राऊत :  २०१४ मध्ये मोदी लाट होती, लाट एकदाच येते.  मग ती राजीव गांधींची असेल, इंदिरा गांधींची असेल, अटलजींच्या नावाची असेल, ती एकदाच येते. पण त्या लाटेवर जी सत्ता येते ती टिकविण्यासाठी आपल्याला काम करावे लागते. आजही मोदींच्या तोडीचा नेता या देशात नाही आहे. त्यामुळे एनडीएतील घटक पक्ष मोदींच्याच नावाने मते मागत आहेत. त्यांनी केलेल्या कामाच्या आधारावर मते मागत आहेत. आज लाट जरी नसली तरी मोदींच्या नावाच्या लोकप्रियतेचा फायदा एनडीएला नक्की होणार आहे. 


प्रशांत जाधव : महाराष्ट्रात युतीला किती जागा मिळतील... 

 1. संजय राऊत :  सध्याची परिस्थिती पाहता, युतीच्या बाजूने चांगला ट्रेंड आहे.  २०१४ चा आकडा आमचा कायम राहील. यासाठी मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत.  युतीला ४२ पर्यंत जागा पुन्हा मिळतील. 
   
लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Exclusive मुलाखत:  'लाव रे तो व्हिडिओ' वर संजय राऊत यांचे रोखठोक मत Description: राऊत यांनी २३ मे रोजीनंतर एनडीएचा पंतप्रधान होणार, कोणत्याही एका पक्षाचा नाही असे स्पष्ट केले. सध्या एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. पण निवडणुका झाल्यावर आम्ही सर्व घटक पक्ष बसू आणि नंतर ठरवू
Loading...
Loading...
Loading...