शिवसेना-भाजप युती संदर्भात मोठी बातमी

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 24, 2019 | 15:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shiv Sena - BJP alliance: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, आज दुपारी भाजपची पत्रकार परिषद होणार आहे.

shiv sena bjp alliance mahayuti uddhav thackeray devendra fadnavis amit shah assembly election 2019 maharashtra
देवेंद्र फ़डणवीस आणि उद्धव ठाकरे (फाईल फोटो) 

थोडं पण कामाचं

  • शिवसेना-भाजपची युती अद्यापही नाहीच
  • दुपारी भाजपची पत्रकार परिषद
  • काही जागांवरुन जागावाटपाची चर्चा अपूर्ण
  • आज युतीची घोषणा होणार नाही

मुंबई: विधासभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची चर्चा अद्यापही पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे शिवेसना-भाजप युतीची आज घोषणा होणार नाहीये. सोमवारी सायंकाळी वृत्त समोर आलं होतं की, शिवसेना-भाजपमधील जागावाटप पूर्ण झालं असून मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होईल. मात्र, दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीची घोषणा मंगळवारी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की नाही? युती झाली तर कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? यासारख्या अनेक प्रश्नांवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे मात्र, अध्यापही युतीची घोषणा झालेली नाहीये. शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युलावर ठाम आहे तर भाजपला अधिक जागा हव्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच शिवसेना-भाजपमधील जागावाटपावरुन अनेक फॉर्म्युला समोर आले होते. मात्र अद्याप तरी दोन्ही पक्षांतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांत १० जागांवरुन घोडं अडलं आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास वृत्त समोर आलं होतं की शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे आणि मंगळवारी दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होऊन युतीची घोषणा करण्यात येईल. पण नंतर शिवसेनेकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर युतीची अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक तब्बल चार तास चालली आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. दरम्यान या बैठकीनंतर आता मंगळवारी भाजपची एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत काही घोषणा होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी