अमित शहांच्या 'त्या' भेटीनंतर अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश, 'या' मतदारसंघातून मिळणार तिकीट?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 13:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunny Deol lok sabha elections 2019: बॉलिवूड अभिनेता सनी देओलने मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर सनी देओलला पंजाबच्या गुरदासपूरमधून उमेदवारी मिळू शकते. 

Sunny deol_facebook
अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश  |  फोटो सौजन्य: Facebook

नवी दिल्ली: दोनच दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर अभिनेता सनी देओलने आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीत सनीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने तो आता गुरदासपूरमधून निवडणूक लढवू शकतो. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सनीला पक्ष सदस्यत्व दिलं. यावेळी रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे देखील उपस्थित होते. याआधी दोन दिवसांपूर्वी सनी देओल आणि अमित शहा यांची पुण्यातील विमानतळावर भेट झाली होती. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेता सनी देओल भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. आता सनी भाजपचा परंपरागत मतदारसंघ गुरदासपूरमधून निवडणूक लढवेल अशीही चर्चा सुरू झाली आहे. 

या मतदारसंघातून अभिनेता विनोद खन्ना हे १९९८, १९९९ २००४ आणि २०१४ मध्ये निवडून आले होते. पण २०१७ मध्ये त्यांचं निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. ज्यामध्ये काँग्रेसचे सुनील जाखड हे विजयी झाले. त्यामुळे आता जर सनीने या मतदारसंघातून निवडणूक लढवली तर त्यांच्यासमोर काँग्रेसचं मोठं आव्हान असणार आहे. तसं पाहता सनी देओलचं कुटुंब बऱ्याच आधीपासून राजकारणात सक्रिय आहे. सनीचे वडील धर्मेंद हे बिकानेरमधून भाजपचे खासदार होते. तर सनीची आई हेमा मालिनी या मथुरातून दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांची युती आहे. या युतीचा काही प्रमाणात सनी देओलला फायदा होऊ शकतो. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विनोद खन्नाने काँग्रेसच्या प्रताप सिंह बाजवा यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात विनोद खन्ना यांना ४,८२,२५५ मतं तर बाजवा यांना ३,४६,१९० मतं मिळाली होती. 

सनी देओल भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा मागील दोन दिवस सुरू होती. यासोबतच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा देखील राजकारणात उतरणार असून तो भाजपकडून निवडणूक लढवेल. अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. पण अक्षयने स्वत: ट्वीट करून या गोष्टीला नकार दिला होता. आपण राजकारणात उतरणार नसल्याचं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपने अनेक सिने स्टार्संना तिकीटं देऊ केली आहेत. भाजपने यंदा रवि किशन, जया प्रदा, हेमा मालिनी या सारख्या सेलिब्रिटींना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता सनी देओलला तिकीट दिल्यास या यादीत आणखी एक नाव जोडलं जाणार आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमित शहांच्या 'त्या' भेटीनंतर अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश, 'या' मतदारसंघातून मिळणार तिकीट? Description: Sunny Deol lok sabha elections 2019: बॉलिवूड अभिनेता सनी देओलने मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर सनी देओलला पंजाबच्या गुरदासपूरमधून उमेदवारी मिळू शकते. 
Loading...
Loading...
Loading...