Lok Sabha 2019 : सुप्रीम कोर्टात राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 15:45 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की चौकीदारच चोर आहे,’ हे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात अवमान नोटिस काढली आहे.

Rahul Gandhi_pti
सुप्रीम कोर्टात राहुलगांधी अडचणीत   |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली : राफेल डिलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा हवाला देऊन प्रचार केल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर राहुल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्याने कोर्टाचे समाधान झाले नसून, कोर्टाने न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस राहुल यांना पाठवली आहे. माझ्या विरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याचा खटला चालवू नये, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला केले होते. पण, कोर्टाने त्यांचे अपील फेटाळून लावले आहे.

कशावरून उठला वाद?

सुप्रीम कोर्टाच्या राफेल प्रकरणातील फेर विचाराच्या निकालाचा आधार घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचार सुरू केला होता. जाहीर सभांमध्ये राहुल कोर्टाच्या म्हणण्याचा उल्लेख करत होते. ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की चौकीदारच चोर आहे,’ या त्यांच्या भाषणातील वक्तव्यावरून भाजपने त्यांना कोंडीत पकडले आहे. अमेठीमध्ये निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर १० एप्रिल रोजी त्यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केले होते. भाजप प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टान राहुल यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. काल (२२ एप्रिल) राहुल यांनी कोर्टात लेखी म्हणणे मांडले. त्यात त्यांनी, सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे. निवडणूक प्रचाराच्या ओघात हे वाक्य बोलून गेल्याचे राहुल यांनी आपल्या लेखी स्पष्टीकरणात म्हटले आहे.

 

 

कोर्टाचे म्हणणे...

सुप्रीम कोर्टाने कधीही ‘चौकीदार चौर है’, असा शब्दप्रयोग केलेला नाही, असे स्पष्ट करत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने राहुल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. आता खंडपीठाने राहुल यांना कोर्टाच्या अवमान प्रकरणी नोटीस पाठवली आहे. कोर्टाच्या अवमान प्रकरणी एखाद्याला नोटीस जाणे खूप गंभीर मानले जाते. सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये संबंधित व्यक्तीला कोर्टात हजर व्हावे लागते. दरम्यान, राफेल डील प्रकरणात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल झाल्या आहेत. या संदर्भात कोर्ट येत्या ३० एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे. परंतु, कोर्टाच्या अवमान प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कोर्टात हजर रहावे लागणार का? याविषयी अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.

वकील काय म्हणतात?

ज्येष्ठ वकील अभिषेक मनु संघवी हे राहुल गांधी यांची बाजू कोर्टात मांडत आहेत. निवडणूक प्रचारामध्ये राहुल यांनी ओघाने असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी त्यांनी खेदही व्यक्त केला आहे, संघवी यांनी म्हटले आहे. मिनाक्षी लेखी यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली आहे. राहुल यांनी हेतूपूर्वक सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन वक्तव्य केले आहे आणि कोर्टाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला आहे. असे मत रोहतगी यांनी मांडले. राहुल आणि त्यांचा पक्ष कोर्टाच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत आणि देशातील मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी असे वक्तव्य करणे बेजबाबदारपणाचे आहे, असे मतही रोहतगी यांनी मांडले आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : सुप्रीम कोर्टात राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या Description: Lok Sabha 2019 : ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की चौकीदारच चोर आहे,’ हे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात अवमान नोटिस काढली आहे.
Loading...
Loading...
Loading...