सुप्रिया सुळेंच्या विजयापेक्षा पार्थ पवारांच्या पराभवाचीच अधिक चर्चा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 10:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड तर राखला मात्र त्यांच्या विजयापेक्षा जास्त चर्चा रंगली ती पार्थ पवारच्या पराभवाची.

parth pawar
सुप्रिया सुळेंच्या विजयापेक्षा पार्थ पवारांचा पराभव चर्चेत 

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने जबरदस्त यश मिळवले. भाजपने २३ तर शिवसेनेने राज्यात १८ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत पाच जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचे पराभव झाले. मात्र सर्वाधिक चर्चा रंगली ती शरद पवारांचा नातू पार्थ पवार याच्या पराभवाची. 

या पराभवामुळे बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा विजयही झाकला गेला. मावळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा नातू तसेच अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात या ठिकाणाहून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचे आव्हान होते. मात्र हे आव्हान मोडीत काढण्यास पार्थ यांना अपयश आले. 

या निवडणुकीत बारामती येथून सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखला. त्यांनी भाजपच्या कांचन कूल यांचा पराभव केला खरा मात्र त्यांच्या विजयापेक्षा राष्ट्रवादीत पार्थ पवार यांच्या पराभवाची मोठी चर्चा झाली. पदार्पणातच पवारांच्या तिसऱ्या पिढीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पार्थ यांना ५,०४,७५०  मते मिळाले तर शिवसेनेच्या बारणेंना ७२०६६३ मते मिळाली. पहिल्याच निवडणुकीत पार्थ यांना तब्बल दोन लाखाहून अधिक मताधिक्याने पराभवास सामोरे जावे लागले. 

दुसरीकडे बारामती येथून सुप्रिया सुळेंनी काचन कूल यांचा १,५५,७७४ मतांनी पराभव केला. सुप्रिया सुळे यांना ६,८६,७१४ मते मिळाली तर कांचन कूल यांना ५,३०,९४० मते मिळाली. २०१४च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा ६९,७१९ मतांनी विजय झाला होता. मोदी लाटेत त्यांचा हा विजय झाला होता. 

शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांचा विजय

शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून विजय मिळवण्यास यश मिळाले आहे. त्यांनी शिरूरमधून शिवसेनेच्या शिवाजी अढळराव यांना ५८,४८३ मतांनी पराभूत केले.  

पुन्हा एकदा मोदी सरकार

यंदाच्या निवडणुकीत देशभरात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला तब्बल ३४९ जागा मिळाल्या तर काँग्रेसलप्रणित यूपीएला ८६ जागा मिळाल्या. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा हा विजय सर्वाधिक आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यास सज्ज झाले आहे. भाजपने काँग्रेसचा सुपडा या निवडणुकीतही साफ केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही मोठ्या मनाने हा पराभव स्वीकारला. तसेच मतदानासाठी धन्यवादही केले. २६ मे रोजी पंतप्रधान मोदी पंतप्रधानची शपथ घेतील असे सूत्रांचे म्हणणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सुप्रिया सुळेंच्या विजयापेक्षा पार्थ पवारांच्या पराभवाचीच अधिक चर्चा Description: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड तर राखला मात्र त्यांच्या विजयापेक्षा जास्त चर्चा रंगली ती पार्थ पवारच्या पराभवाची.
Loading...
Loading...
Loading...