Maharashtra Political Crisis | ही वेळ एकमेकांना आव्हान देण्याची नव्हे, तर एकमेकांशी संवाद साधण्याची आहे, असा सल्ला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांना दिला आहे. शिवसनेत झालेल्या बंडानंतर भास्कर जाधवही नॉट रिचेबल झाल्याची बातमी काही माध्यमांत झळकली होती. मात्र प्रत्यक्ष ते त्यांच्या भावाच्या शस्त्रक्रियेत व्यस्त असल्याचं स्पष्ट झालं होतं. माध्यमांनी त्यांना गाठून त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
सध्या शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. बहुतांश आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले असून सरकारला त्यांनी आव्हान दिले आहे. अशा परिस्थितीत एकमेकांना आव्हान दिल्याने काहीच साध्य होणार नाही, याची जाणीव भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांना करून दिली आहे. ते म्हणाले, “ही वेळ एकमेकांना आव्हान देण्याची नाही, तर एकमेकांशी संवाद साधण्याची आहे. आपले आमदार नाराज का आहेत, ते आपल्याला सोडून का गेले, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. आमदारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, ते समजून घेण्याची गरज आहे. वास्तविक, संजय राऊत हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना मला कुठलाही सल्ला द्यायचा नाही. मात्र परिस्थिती ओळखून पावलं टाकणं हेच पक्षाच्या हिताचं असेल, असं जाधव यांनी सूचित केलं आहे.
अधिक वाचा - "वेळ निघून गेलीय, आता आमचं चॅलेंज आहे तुम्ही या इथे" राऊतांचं शिंदेंना खुलं आव्हान
आपल्या कोट्यातील मंत्रिपदं इतरांना देऊ नका, असं मी अगोदरच सांगत होतो. मात्र शिवसेनेनं त्यांना मिळालेली मंत्रिपदं ही अपक्षांना वाटून टाकली. त्यामुळे पक्षाच्या विद्यमान आमदारांमध्ये नाराजी पसरणं साहजिक आहे. एखाद्या मंत्रिपदाचं समजू शकतो, पण तीन पक्षांच्या सरकारमध्ये आपल्या वाट्याला आलेल्या एकूण मंत्रिपदांपैकी तीन पदं अपक्षांना का देण्यात आली, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. ही पक्षाची घोडचूक होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा - राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही, भाजपच्या 'या' नेत्याने केले स्पष्ट
शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार सध्या गुवाहाटीमध्ये असून ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया सुरू असल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंनीदेखील शिवसेनेला आव्हान दिलं असून आमच्यासोबत बहुतांश आमदार असल्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असणारी अनैसर्गिक आघाडी सोडून भाजपसोबत युती करण्याची अट बंडखोर आमदारांच्या गटानं ठेवली आहे. या मुद्द्यावरून सध्या दोन्ही गट एकमेकांना आव्हानं आणि प्रतिआव्हानं देत असल्याचं चित्र आहे. मात्र या प्रकारामुळे आपल्याच पक्षाचं अधिक नुकसान होणार असून एकमेकांशी संवाद साधण्याची खरी गरज असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.