VIDEO: अमित शहा मला म्हणाले 'झालं गेलं विसरुन जा', मग मी देखील म्हणालो की...: उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 02, 2019 | 21:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Uddhav Thackeray interview: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबतचं गुपित उघड केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मला झालं गेलं विसरून जा. असं म्हटलं त्यामुळे मी देखील त्यांना म्हटलं की...

uddhav thackeray_saamana youtube
अमित शहा मला म्हणाले, झालं गेलं विसरुन जा: उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य: @Saamana)  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई: 'अमित शहा मला म्हणाले की, मागे झालं गेलं ते विसरुन जा... आपल्याला आता पुढे जायला हवं. आपल्याला मागच्या गोष्टी संपवून टाकायच्या आहेत. मी त्यांना म्हणालो बरं ठीक आहे.' अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीचं गुपित उघड केलं. 'अमित शहा दोनदा घरी आले होते, बऱ्याचदा त्यांचं आणि माझं बोलणंही होतं. ते काही वेळा फोन देखील करतात.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीत सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला एक प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीच ही मुलाखत घेतली आहे. याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अमित शहा आपल्यामधील संबंध अतिशय चांगले असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, असं असलं तरीही उद्धव ठाकरेंनी काही गोष्टींवरुन भाजपला कानपिचक्या देखील दिल्या आहेत. 'युती टिकावी यासाठी प्रामाणिकपणा गरजेचा आहे.  आम्ही कोणाला दगा देत नाही, त्यामुळे कुणी आम्हाला देखील दगा देता कामा नये. अशा आमची स्पष्ट भूमिका आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपने यापुढे युती कायम ठेवावी असाच संदेश दिला आहे. 

'लोकांना खोटी स्वप्न दाखवू नका'

या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना टार्गेट देखील करण्याचा प्रयत्न केला. 'राजकीय पक्षांनी लोकांना खोटी स्वप्न दाखवू नयेत. जी आश्वासनं पूर्ण होणार नाहीत त्याबाबत अजिबात बोलू नये. जे सत्य असेल तेच बोललं पाहिजे. पण आता सध्या जुमलेबाजीचं राजकारण सुरु आहे. पण ठाकरे कधीही अशी खोटी आश्वासनं देत नाहीत.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींनाचा टार्गेट केलं. कारण याआधी उद्धव ठाकरेंनी आपल्या अनेक जाहीर भाषणामधून १५ लाख रुपये, अच्छे दिन यासारख्या गोष्टींवरुन टीका केली होती. 

 

 

'काँग्रेसमुक्त भारत हे मला अजिबात पटत नाही...' 

याच वेळी उद्धव ठाकरेंनी मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत या गोष्टीला देखील जोरदार विरोध दर्शवला. 'काँग्रेसमुक्त देश झाला पाहिजे ही भूमिका योग्य नाही. त्यामुळे काँग्रेस नष्ट झाला पाहिजे असं मी अजिबात बोलत नाही. कारण विरोधी पक्ष कायम राहिला पाहिजे. कारण विरोधी पक्षावर देखील मोठी जबाबदारी असते. सरकार योग्य पद्धतीने काम करतं की नाही, हे पाहणं विरोधी पक्षाचं काम असतं. याशिवाय देशातील जनतेला न्याय देणं हे यासारखी महत्त्वाची जबाबदारी देखील विरोधी पक्षाची असते. त्यामुळे कुणालाही नष्ट करा या फालतू कल्पनांना मी थारा देत नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या काँग्रेसमुक्त या घोषणेलाच विरोध केला आहे. 

बेकारी वाढलीय, उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

दुसरीकडे बेकारीवरुन देखील उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. एकीकडे मोदी सरकार देशात रोजगार वाढल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नुकतेच युती सामिल झालेले उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली आहे. 'गेल्या चार वर्षात बेरोजगारी बरीच वाढली आहे. बेरोजगारीचं प्रमाण हे तब्बल ४५ टक्के एवढं आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला गेला पाहिजे.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

'निवडणुकीनंतर राम मंदिर पूर्ण करा नाहीतर...' 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराची भाजपला आठवण करुन दिली आहे. 'लोकसभा निवडणुका झाल्या की, राम मंदिर पूर्ण झालं पाहिजे. तसं झालं नाही तर मात्र मी, पुन्हा एकदा अयोध्याला जाईन.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे भविष्यात या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेत युद्ध पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

'चौकीदार' कॅम्पेनला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा नाही? 

या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या 'चौकीदार' कॅम्पेनला देखील फारसा पाठिंबा दिलेला नाही. 'आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे सैनिक म्हटल्यावर आम्हाला आणखी चौकीदार होण्याची गरज नाही. आम्ही सामान्य माणसांसाठी लढतो त्यांचे संरक्षण करतो त्यामुळे वेगळा चौकीदार कशाला व्हायचं?' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंकडून मोदींचं कौतुक 

दरम्यान, मुलाखतीच्या शेवटी मात्र, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बरंच कौतुक देखील केलं आहे. 'विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी चेहराच नाही. मोदींनी काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत. त्यामुळे मोदींचं सरकार हे निर्णय घेणारं सरकार असल्याचं जनतेला वाटतं आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी कुणी दुसरं पंतप्रधान व्हावं अशी अद्याप वेळ आलेली नाही.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी