vidhansabha election 2019 : राज ठाकरे वाढविणार सेना-भाजपचे डोकेदुखी, आखला 'गेम प्लान' 

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 23, 2019 | 21:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

vidhansabha election 2019 : राज ठाकरे यांनी अजूनही आपले पत्ते उघडे केले नाही. पण आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी मोठा गेम प्लान तयार केला आहे. 

vidhansabha election 2019 bjp shiv sena raj thackeray game plan mns gave ticket to rebel news in marathi
राज ठाकरे वाढविणार सेना-भाजपचे डोकेदुखी, आखला 'गेम प्लान'  

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आखला गेम प्लान
  • बंडखोरांना तिकीट देऊन मनसे करणार भाजप सेनेचा गेम
  • एका दगडात दोन पक्षी मारण्याचा राज ठाकरे यांना डाव

मुंबई : आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाकडून १०० जागा लढविणार आहेत. पण यंदा ते आपल्या पक्षातील उमेदवारांना नाही तर भाजप आणि शिवसेनेतून नाराज झालेल्या बंडखोरांना तिकीट देण्याच्या तयारी आहेत. यातून एका दगडातून दोन पक्षी मारण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे. यात आपल्या पक्षातून मोठ्या प्रमाणात होणारा निवडणूक खर्चही या निमित्ताने टाळला जाईल, तर दुसरा फायदा भाजप आणि सेनेला डोकेदुखी निर्माण केली जाईल असे दोन फायदे राज ठाकरे आपल्या पदरात पाडून घेण्याचा विचार करत आहे. 

या संदर्भात मराठवाड्यातील मनसे नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील निष्टावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी गेली पाच वर्षे आपला मतदार संघ बांधणी केला आहे. तसेच त्यांनी खर्चही मतदारसंघात केला आहे. जर भाजप किंवा शिवसेनेकडून तिकीट नाही मिळाले तर गेल्या पाच वर्षातील मतदारसंघातील खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढविण्यापेक्षा मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढविल्यास आपला वोट बेस आणि मनसेचा वोट बेस मिळून भाजप आणि शिवसेनेला टफ फाईट दिली जाऊ शकते. त्यामुळे मराठवाड्यातील मनसेच्या संपर्क प्रमुखांशी बंडखोर संपर्कात आहे. त्यांना तिकीट नाही मिळाले तर निवडणुकीपूर्वी ते मनसेत दाखल होऊन पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.  या संदर्भातील एक यादी मराठवाड्यातील पक्ष संघटनेने राज ठाकरे यांच्याकडे पाठवली आहे. त्यावर राज ठाकरे निर्णय घेऊन या बंडखोरांना तिकीट देण्याचा गेम प्लान प्रत्यक्षात उतरविण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही या संदर्भात चाचपणी केली होती. त्यानंतर दोन मतप्रवाह आले होते. त्यातील एका गटाच्यामते सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक न लढवलेली बरी अस म्हणण्यात आले होते. तर दुसऱ्या गटामार्फत आपण निवडणूक लढवली नाही तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल असे म्हटले होते.  या बैठकीत राज ठाकरे यांनी आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर पैसे जपून वापरण्याचा सल्लाही दिला होता. त्यामुळे या नव्या गेम प्लानने पक्षाचा निवडणूक खर्च बंडखोरांच्या डोक्यावर टाकून पक्षाचा पैसा वाचविण्याची रणनिती राज ठाकरे यांनी आखल्याचे समजते आहे. 

तसेच लावरे व्हिडिओ म्हणत लोकसभेत राज ठाकरे यांनी भाजप आणि सेनेची डोकेदुखी वाढवली होती. पण मतांच्या बाबतीत राज ठाकरे यांचा काही परिणाम झालेला दिसला नाही.  या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर मैदानात उतरविल्यास दोन्ही पक्षांची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच याचा प्रत्यक्ष फायदा जरी मनसेला झाला नाही, तरी मतं खाऊन ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत करण्याची रणनितीही आखली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...