वंचित आघाडीत काडीमोडावर शिक्कामोर्तब, जलील वक्तव्याला ओवैसींची पाठिंबा 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी जुळून आलेली भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमची वंचित बहुजन आघाडीमध्ये काडीमोड झाल्याचे निश्चित झाले आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख औवेसी यांनी याला दुजोरा दिला आहे. 

vidhansabha election 2019 prakash ambedkar imtiyaz jaleel asaduddin owaisi maharashtra election vanchit bahujan aghadi news in marathi
असादुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युती तुटल्यात जमा आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  प्रकाश आंबेडकरांनी वंचितला केवळ ८ जागा सोडल्याने नाराज झालेल्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही युती तुटल्याचे एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते. पण हा एमआयएम अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी हे जो पर्यंत सांगत नाही तोपर्यंत युती कायम असल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती. मात्र, आता स्वतः ओवैसी यांनी जाहीर केले की, जलील यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे ही युती तुटल्याचे बोलले जात आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आम्हांला सन्मानाची वागणूक दिली नाही. पुण्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, दोन दिवसात निर्णय देतो. त्यानंतर त्यांच्याकडून काही हालचाल नव्हती आणि अचानक त्यांनी केवळ ८ जागा एमआयएमला सोडल्याचे जाहीर केले. ही जी ऑफर केली ती आम्हांला मान्य नाही. त्यामुळे या युतीतून बाहेर पडल्याचे पत्रक जलील यांनी काढले होते. या पत्रकावर बोलताना ओवैसी यांनी जलील यांच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे. इम्तियज जलील हे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. त्यांचाच निर्णय हा अंतीम असेल असे म्हणून ओवैसी यांनी युतीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे बाहेर पडून वंचित बहूजन आघाडीची ताकद ओवैसी यांनी कमी केली आहे. त्यामुळे हा आंबेडकरांना धक्का मानला जात आहे. 

ओवैसी यांना पत्रकार परिषदेत या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, इम्तियाज जलील यांचे ऑफियल स्टेटमेंट हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे ते म्हटले ते आम्हांला मान्य आहे. तसेच यापुढे जाऊन आगामी काळात कोणाशी युती होईल किंवा किती जागा लढविल्या जातील याचा निर्णय सर्वस्वी महाराष्ट्र युनिट म्हणजे इम्तियाज जलील घेणार असल्याचे ओवैसी यांनी स्पष्ट केले. 

ओवैसी यांच्या भूमिकेपर्यंत युती कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. पण आता ओवैसींनी जलील यांच्या भूमिकेची री ओढल्यानंतर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी