VIDEO: अमित शहांच्या रोड शो दरम्यान तुफान राडा, दगडफेक आणि जाळपोळ

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 14, 2019 | 20:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो सुरु असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यानंतर तेथे जाळपोळ आणि हाणामारीचा प्रकार घडला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे हा प्रकार घडला आहे.

Clash in BJP president Amit Shah's roadshow in Kolkata
VIDEO: अमित शहांच्या रोड शो दरम्यान तुफान राडा, दगडफेक आणि जाळपोळ   |  फोटो सौजन्य: ANI

कोलकाता: लोकसभा निवडणूक २०१९ साठीचं सहा टप्प्यांतील मतदान पार पडलं असून आता शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा कोलकातामध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, या रोड शो दरम्यान हिंसाचार झाल्याचं पहायला मिळालं. कोलकातामधील कॉलेज स्ट्रीट मार्गावरुन अमित शहा यांचा रोड शो सुरु असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनाही दुखापत झाली.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, अमित शहा यांच्या रोड शो साठी लावण्यात आलेले पोस्टर्स तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हटवली. भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं की, 'ममताजींचे कार्यकर्त्ये आणि पोलिसांनी पोस्टर्स, भाजपचे झेंडे हटवले. आम्ही येथे पोहोचल्यावर त्यांनी पळ काढला.'

व्हिडिओत आपण पाहू शकतो की, भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले आहेत. या दरम्यान काही कार्यकर्ते लाठ्या-काठ्या तर काहीजण चक्क पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स सुद्धा उचलून फेकत आहेत. या दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर लाठीमार करावा लागला.


मतदानासाठी आात शेवटचा टप्पा शिल्लक राहील्याने सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलिया येथे जाहीर सभा घेतली. तर, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी तृणमूल काँग्रसेचा गड असलेल्या कोलकातामध्ये रोड शो आयोजित केला होता. याच रोड शोमध्ये दगडफेक, जाळपोळ झाली आहे.

सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात देशभरातील ५९ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये बिहारमधील ८, हिमाचल प्रदेशातील ४, झारखंडमधील ३, मध्यप्रदेशातील ८, पंजाबमधील १३, उत्तरप्रदेशात १३, पश्चिम बंगालमधील ९ आणि चंडीगढमधील एका जागेचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी