मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महाराष्ट्रातील ईशान्य मुंबई या मतदारसंघाची बरीच चर्चा झाली आहे. ही चर्चा रंगली होती ती म्हणजे येथे भाजपचा उमेदवार नेमका असणार तरी कोण? गेले अनेक दिवस सुरु असलेल्या या चर्चेवर अखेर आज पडदा पडला आहे. कारण की, येथील विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचा पत कट करत भाजपने मुंबई महापालिकेतील नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी देऊ केली आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर मनोज कोटक यांनी तात्काळ सोमय्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची गळाभेटही घेतली. यावेळी कोटक यांनी सोमय्यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी सोमय्यांनी देखील आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली.
'मनोज कोटक हा अतिशय तडफदार उमेदवार असल्याने ईशान्य मुंबईची जागा ही संपूर्ण लोकसभा निकालांमध्ये टॉप १० मध्ये असेल. मी कोणावरही नाराज नाही.' असं सोमय्या यावेळी म्हणाले.
याचवेळी सोमय्यांनी शिवसेनेने केलेल्या विरोधाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 'पक्ष माझ्याकडे जी जबाबदारी सोपवतो ती मी पार पाडतो. २०१९च्या पुढे देखील पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. पक्षाने भष्ट्राचाराविषयी जी काही कामगिरी दिली होती ती मी पार पाडली होती.' असं सूचक वक्तव्यही यावेळी सोमय्यांनी केलं.
'मला उमेदवारी गमवल्याचं अजिबात दु:ख नाही. उलट पक्षासाठी आणि समाजासाठी समर्पण केल्याचा आनंद सर्वाधिक आहे. कारण देशात मोदी सरकार पुन्हा यावं यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सारं काही करणार.' असं म्हणत सोमय्यांनी आपली पक्षाशी बांधिलकी कायम असल्याचं म्हटलं आहे.
याचवेळी सोमय्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, 'मी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. माध्यमांमध्ये आलेलं वृत्त चुकीचं आहे.' असं सोमय्या यावेळी म्हणाले.
दरम्यान, याचवेळी कोटक यांनी देखील सोमय्यांचे आशीर्वाद घेतले. 'ईशान्य मुंबईची जागा देशात टॉप १० विजयी जागांपैकी एक असेल. सोमय्या हे आपल्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत त्यामुळे त्यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे पुढे नेणार आहोत. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची आम्हाला नेहमीच गरज भासणार आहे.' असं कोटक यावेळी म्हणाले.