Lok Sabha 2019: भाजपच्या विजयाचा अंदाज भोवला, प्राध्यापक निलंबित

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 14, 2019 | 18:16 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019: भाजपला ३००हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करणाऱ्या प्राध्यापक महाशयांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता असल्यामुळेच प्राध्यापकावर कारवाई झाल्याची चर्चा आहे.

madhya pradesh ujjain vikram university professor suspended after his prediction of 300 plus seats to bjp
भाजपच्या विजयाचा अंदाज भोवला, प्राध्यापक निलंबित  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मध्य प्रदेशात 'सुडाचे राजकरण'?
  • भाजपच्या विजयाचा अंदाज प्राध्यापकांकडून व्यक्त
  • फेसबुक पोस्टमुळे प्राध्यापकांवर निलंबनाची कुऱ्हाड

भोपाळ:  लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. सहा टप्प्यातील मतदान झाले असून, सातवा शेवटचा टप्पा राहिला आहे. येत्या १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २३ मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे आता कोणाला किती जागा मिळणार? कोण सत्तेवर येणार? याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मतांची गणितं मांडली जात आहेत. नवनवीन आडाखे बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशमधील एका प्राध्यापकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा फटका बसला. भाजपला ३००हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करणाऱ्या प्राध्यापक महाशयांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. सध्या मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता असल्यामुळेच संबंधित प्राध्यापकावर अशी कारवाई करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावरून मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये विक्रम विद्यापीठ आहे. विद्यापीठात राजेश्वर शास्त्री मुसळगावकर प्राध्यापक आहेत. विद्यापीठात संस्कृत वेद जोतिर्विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहतात. त्यांनी फेसबुकवर भाजपचा बंपर विजय होईल, अशी भविष्यवाणी केली होती. या संदर्भातील पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली होती. मात्र, कमलनाथ सरकारने त्यांना निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. मुसळगावकर यांच्या मतानुसार भाजपला देशात यंदा २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतील.

‘माझ्या अकाउंटवर विद्यार्थ्यांनी पोस्ट केली’

भाजपला ३०० तर एनडीएला ३००हून अधिक जागा मिळतील, असे मत मुसळगावकर यांनी व्यक्त केले होते. त्यावर त्यांना निलंबित व्हावे लागले. याप्रकरणात सरकारने कारवाई केली असली तरी आपण निरपराधी असल्याचे मुसळगावकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘मी ज्योतिषशास्त्राच्या आधारे भविष्यवाणी केली आहे. तो अंदाज शक्यतांवर आधारीत असतो. कुंडलीच्या आधारेच काही अनुमान काढले होते. त्यात एखाद्या पक्षाला मतदान करा किंवा एखाद्याला करू नका, असे कोठेही म्हटले नव्हते. त्यामुळे आचारसंहिता भंगचा प्रश्नच नव्हता. मुळात माझा मोबाईल आणि कॉम्प्युटर कायम सुरूच असतो. त्यावरून विद्यार्थ्यांपैकी कोणी तरी ती पोस्ट केली होती. आता सरकारने कारवाई केली आहे. ती मान्यच करावी लागेल. पण, मी निरपराध आहे.’ मुसळगावकर यांनी आपला अंदाज व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली. यासाठी राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने शिफारस केली होती. मध्यप्रदेश विद्यापीठ अधिनियम १९७३नुसार ही करवाई करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी