Lok Sabha 2019 : वाराणसीत प्रियंका गांधीचे डिपॉझिट जप्त होईल; पाहा कोणी केला दावा!

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 16, 2019 | 13:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : उत्तर प्रदेशात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस प्रियंका गांधी यांना उतरवण्याचा विचार करत आहे. पण, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा भाजपच्या आमदारांनी केलाय.

priyanka gandhi`s deposit will be seized if she contest election from varanasi against narendr modi says bjp mla
वाराणसीत मोदींना आव्हान देणे अशक्य; भाजप आमदारांचा दाव  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रियंका गांधी?
 • वाराणसीत विरोधकांना संधीच नाही : भाजप आमदार जैसवाल
 • प्रियंका गाधी आल्या तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल : जैसवाल

वाराणसी : गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शेवटच्या टप्प्यात ऐनवेळी पंतप्रधान मोदींपुढे प्रियंकां गांधींचे आव्हान उभे करण्याची काँग्रेसची चाल असल्याचे बोलले जात आहे. पण, प्रियंका गांधी जर, वाराणसीतून लढल्या तर, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा भाजपचे वाराणसी उत्तरचे आमदार रवींद्र जैसवाल यांनी केला आहे. विरोधीपक्षाचे काम हे बोलण्याचे आहे. जर, ते बोलले नाही तर, विरोधीपक्षच संपून जाईल. त्यामुळे विरोधकांनी बोलले पाहिजे. पण, सध्याची परिस्थिती अशी आहे की विरोधकांना बोलायला जागाच नाही. त्यांची अवस्था बिना दारू गोळ्याच्या खोक्या सारखी झाली आहे. आता अशी ५०० खोकी आणली तरी, त्याचा काही फरक पडत नाही.

काशी हा बुद्धिजिवींचा बालेकिल्ला असल्याचे सांगून जैसवाल म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान आपल्या मतदारसंघातून निवडून जातात, हे कोणत्याही मतदारसंघासाठी अभिमानास्पद आहे. मुळात २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघातून निवडून गेल्याने या मतदारसंघाचे मागासलेपण निघून गेले. २०१४मध्ये पंतप्रधान मोदींनी बनारसमधून विजय मिळवला. त्यानंतर सरकारकडून बनारसमध्ये विकासकामांसाठी ४२ लाख कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आता विरोधकांना बोलायला जागा राहिलेली नाही. एकदा केजरीवाल मोदींच्या विरोधात येथे लढायला आले होते. आता प्रियंका येत असतील तर येऊ देत. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल.’

जनता आता शहाणी झाली आहे. जेवढी माहिती तुम्हा आम्हाला असते त्यापेक्षा जास्त माहिती आता जनतेकडे असते, असा जैसवाल यांनी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीमधून लढण्याचे निश्चित झाले. तेव्हा भाजप नव्हे तर, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही लाडू वाटले होते. आम्ही विरोधी असलो तरी आम्ही वाराणसीचे आहोत. आता वाराणसीचा आणखी विकास होईल, असे मत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते.’

गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ लाख ८१ हजार मते मिळाली होती. प्रतिस्पर्धी उमेदवार अरविंद केजरीवाल यांचा त्यांनी तीन लाखांहून अधिक फरकाने पराभव केला होता. 

मोदींनी १९ वेळा दिली भेट

जैसवाल म्हणाले, ‘दर वेळी मोठ्या पदावरचा नेता कामाच्या बोजाने मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतो, असे चित्र असते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत असे झाले नाही. त्यांनी गेल्या पाच वर्षांत १९ वेळा बनारस मतदारसंघाला भेट दिली.’ देशात आजवरच्या इतिहासात आपल्या मतदारसंघात १९ वेळा गेलेले ते एकमेव पंतप्रधान असावेत, असा दावा जैसवाल यांनी केला.

असा झाला बनारसचा कायापालट

 1. पंतप्रधान मोदी निवडून आल्यानंतर बनारसची इतर जिल्ह्यांशी कनेक्टिविटी वाढली
 2. बनारस-गाझीपूर, बनारस-आझमगड, बनारस-गोरखपूर, बनारस-लखनौ रस्ते चारपदरी झाले
 3. बनारस-अलाहाबाद रस्ता सहा पदरी झाली
 4. गंगानदीतून व्यापार वाहतूक सुरू झाली; वाहतुकीच्या दहा टक्के खर्चात बचत
 5. गंगा किनाऱ्यावर असूनही बनारसमध्ये होती पिण्याच्या पाण्याची समस्या
 6. अमृत योजनेच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांत ३१ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या
 7. प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने बनारसमध्ये आली गुंतवणूक
 8. ५०० कोटी रुपयांचे सूपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होत आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : वाराणसीत प्रियंका गांधीचे डिपॉझिट जप्त होईल; पाहा कोणी केला दावा! Description: Lok Sabha 2019 : उत्तर प्रदेशात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस प्रियंका गांधी यांना उतरवण्याचा विचार करत आहे. पण, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा भाजपच्या आमदारांनी केलाय.
Loading...
Loading...
Loading...