नथुराम गोडसे देशभक्त: भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 16, 2019 | 18:18 IST | टाइम्स नाऊ हिंदी

लोकसभा निवडणुकीतील भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी साध्वीवर निवडणूक आयोगानं प्रचारबंदी घातली होती.

Sadhvi Pragya Thakur
साध्वी प्रज्ञा ठाकूरचं वादग्रस्त वक्तव्य  |  फोटो सौजन्य: ANI

भोपाळ: लोकसभा निवडणूक २०१९ आता आपल्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलीय. राजकीय पक्षांचं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं सुरूच आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसे विषयी केलेल्या वक्तव्यावरून अजून आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. यापूर्वीच भाजपनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना त्या तुरूंगात टाकत असल्याचा आरोप केलाय. तर आता दुसरीकडे नथुराम गोडसे वादावरून भोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलंय.

भाजपच्या भोपाळ येथील उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं, ‘नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्त राहतील. जे लोक त्यांना दहशतवादी म्हणत आहेत, त्यांनी आधी स्वत: आपल्याकडे बघावं. अशा लोकांना निवडणुकीत जनताच उत्तर देईल.’

यापूर्वीही साध्वी प्रज्ञा ठाकूरनं २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.

दरम्यान, साध्वी प्रज्ञा ठाकूरच्या या वादग्रस्त वक्तव्याचा त्यांच्या पक्षानंच भाजपनं निषेध केलाय. पक्षाचे नेते जी. वी. एल. नरसिम्हा राव यांनी म्हटलं, ‘भाजप या वक्तव्याशी सहमत नाहीये, आम्ही याचा निषेध करतो. पक्ष प्रज्ञा ठाकूर यांच्याकडे स्पष्टीकरण मागेल, त्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या या वक्तव्याची क्षमा मागितली पाहिजे.’

तामिळनाडूतील ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाचे नेते आणि अभिनेते कमल हसन यांनी स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी असा उल्लेख नथुराम गोडसेचा केला होता. हसन तामिळनाडूच्या अरवाकुरिची इथं होत असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. तेव्हा तिथल्या सभेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरून खूप वादही झाला होता.

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे आपल्या शापामुळे मारले गेले, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसंच बाबरी मशीद पाडायला मी गेली होती आता राम मंदिर बांधायला पण जाईल, असंही साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावत कारवाई सुद्धा केली होती. आता भोपाळचं मतदान झालेलं आहे. भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा मुकाबला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासोबत आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
नथुराम गोडसे देशभक्त: भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर Description: लोकसभा निवडणुकीतील भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी साध्वीवर निवडणूक आयोगानं प्रचारबंदी घातली होती.
Loading...
Loading...
Loading...